मुंबई - Happy Birthday to You song : 'हॅपी बर्थडे टू यू' हे आयकॉनिक गाणं वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये हमखस ऐकायला मिळतं. हे गाणं जगभरात जवळजवळ प्रत्येक वाढदिवसाला वाजवलं जातं. याची सुरुवात कशी आणि कधी झाली, त्यामागील कहाणी काय आहे, ज्यामुळे हे गाणं जगभर प्रसिद्ध झालं, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. आज आम्ही तुमच्यासाठी याची उत्तरं घेऊन आलो आहोत. आपण लहानपणापासून ऐकत आलेल्या या गाण्याचा प्रवास कसा झाला, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे गाणं कसं तयार झालं : 19व्या शतकाच्या उत्तरार्धात पॅटी आणि मिल्ड्रेड हिल या दोन अमेरिकन बहिणींपासून याची सुरुवात झाली. त्यांनी आपल्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी 'गुड मॉर्निंग टू ऑल' नावाचं एक गाणं तयार केलं होतं, जे नंतर 'हॅपी बर्थडे टू यू'मध्ये बदललं. हे इंग्रजीत सर्वाधिक गायलं जाणारं गाणं ठरलं. हे गाणं इतक लोकप्रिय होईल, याची कल्पना त्यांनी देखील केली नव्हती. 'हॅपी बर्थडे टू यू' हे गाणं 1901 मध्ये प्रथम प्रकाशित झालं. त्याची चाल 1911 मध्ये तयार झाली, त्यानंतर हे गाणं 1930 पर्यंत लोकप्रिय झालं. यानंतर अनेकवेळा कॉपीराइटच्या समस्या येत होत्या. यावर उपाय म्हणून हिल सिस्टर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खटला दाखल करून कॉपीराइट स्वत:कडे राखून ठेवले.
कॉपीराइटच्या समस्या : वॉर्नर कम्युनिकेशन्सनं 1988 मध्ये या गाण्याचे अधिकार घेतले. त्याची कायदेशीर लढाई 2016 मध्ये संपली आणि वॉर्नर म्युझिक ग्रुपनं केस गमावली, त्यांना $14 दशलक्ष नुकसान भरपाई द्यावी लागली. सध्या सोशल मीडियावर वाढदिवसाची अनेक गाणी असली तरी हे गाणं आता देखील खूप लोकप्रिय आहे. आता सोशल मीडियावर 'हॅपी बर्थडे बेबी', 'हॅपी बर्थडे स्वीट',' हॅपी बर्थडे डार्लिंग' आणि 'हॅपी बर्थडे' अशी अनेक गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. दरम्यान 'हॅपी बर्थडे टू यू' गाण्याला 1996 मध्ये सॉन्गरायटर्स हॉल ऑफ फेम कडून मिल्ड्रेड आणि पॅटी स्मिथ यांना मरणोत्तर टॉवरिंग सॉन्ग अवॉर्ड मिळालं होतं.