मुंबई - Gharat Ganapati trailer : बहुप्रतीक्षित 'घरत गणपती'चा रंजक ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 26 जुलै रोजी रिलीज होणार असलेल्या या चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर घरत या कोकणातील कुटुंबीयांच्या घरातील गणेश उत्सवात एकत्र आलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या पात्रांचा परिचय करुन देणारा आहे. धमाल प्रसंगांची रेलचेल असलेला हा ट्रेलर प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाल्याचं दिसत आहे.
घरत कुटुंबाच्या गणेश उत्सवात सालाबादप्रमाणे सर्व सदस्य एकत्र आले आहेत. अशात या घरातील तरुण सदस्य किर्ती आहुजा ( निकिता दत्ता ) या त्याच्या मैत्रीणीला घेऊन आला आहे. घरत यांच्या कुटुंबाला हा एक सांस्कृतिक धक्का आहे. ती घरी येते आणि आपल्या आधुनिक विचार आचारांचा प्रभाव कृतीतून दाखवायला लागते. ही गोष्ट इतरांना पटत नाही. कुटुंबातील किरकोळ कारणावरुन चालणारी धुसफूस अचानक वाढते. सर्व कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी किर्ती कशा प्रकारे युक्ती करते याचे चित्रण या चित्रपटात पाहायला मिळेल.
‘कुटुंब’हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. कुटुंबातील,नात्यागोत्यातील प्रत्येकाशी आपलं प्रेमाचं, स्नेहाचं एक वेगळं नातं असतं. मराठी चित्रपटांतूनही कौटुंबिक विषय अतिशय उत्तमतेने हाताळलेले आपण पाहतो. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणारी 'घरत कुटुंबा'ची मजेशीर गोष्ट आपल्याला आगामी 'घरत गणपती' या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.
मायेने आणि आपलेपणाने माणसं जोडणाऱ्या घरत कुटुंबातील ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या वेळी घडणारी गमतीशीर गोष्ट चित्रपटात पहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर कथाविषय, त्याला अभिनयसंपन्न कलाकारांची जोड यातून एक उत्तम कलाकृती दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर आपल्यासमोर घेऊन आले आहेत. हे या ट्रेलरमधून स्पष्ट दिसत आहे.
निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग, आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर,दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हेही वाचा -