मुंबई - Shilpa shinde : न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल समोर आल्यापासून, मल्याळम, तेलुगू आणि तमिळ चित्रपट उद्योगातील अनेक कलाकारांनी लैंगिक छळाबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध लोकांवर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत. एकामागून एक अभिनेत्री समोर येत आहेत आणि त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक छळाबद्दल दावे करत आहेत.आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेनं तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात एका हिंदी चित्रपट निर्मात्यानं तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
शिल्पा शिंदेचा मोठा आरोप : 'भाबीजी घर पर हैं!' फेम शिल्पानं एका मुलाखतीत दावा केला की,ऑडिशनच्या नावाखाली एका चित्रपट निर्मात्याला आकर्षित करण्यास तिला सांगितलं होतं. यावेळी तिनं म्हटलं, "हे माझ्या संघर्षमय दिवसात झालंय, ही घटना 1998-99 च्या जवळपास घडली. मी आता नावं घेऊ शकत नाही, पण तो म्हणाला होता, तू हे कपडे घाल आणि हा सीन कर. यानंतर मी ते कपडे घातले नव्हते." त्यानं मला पुढं सांगितलं की, तो माझा बॉस आहे आणि मला त्याला आकर्षित करायचं आहे. तेव्हा मी खूप भोळी होती, म्हणूनच मी हा सीन केला. त्या व्यक्तीनं माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि मी खूप घाबरले. मी त्याला ढकलून बाहेर पळत सुटले. सुरक्षा रक्षकांना घडलेला प्रकार लक्षात आला आणि त्यांनी मला ताबडतोब निघण्यास सांगितलं. त्याला वाटलं की मी हा सीन करेन आणि मदत मागेन."
काय झालं शिल्पा शिंदेबरोबर : यानंतर तिनं पुढं सांगितलं, "तो हिंदी चित्रपटसृष्टीतला होता, म्हणून मी हा सीन करायला तयार झाले, कारण तो देखील एक अभिनेता होता. मी खोटे बोलत नाही, पण मी त्याचं नाव घेऊ शकत नाही. त्यांची मुलं माझ्यापेक्षा थोडी लहान असतील आणि मी त्याचं नाव घेतल्यास, त्यांना देखील वाईट वाटेल." तसंच तिनं पुढं म्हटलं, "काही वर्षांनी मी त्याला पुन्हा भेटले आणि तो माझ्याशी प्रेमानं बोलला. त्यानं मला चित्रपटात काम करण्याची ऑफरही दिली. मी नकार दिला. त्याला अजूनही काही आठवलं नाही. या गोष्टी सगळ्यांच्याच बाबतीत घडतात. काही माझ्यासारखे पळून जातात. मी काही अभिनेत्रीबरोबर बोलले तर त्यांना देखील याच परिस्थितीचा सामना करावा लागला, असं त्यांनी सांगितलं. काही सेलिब्रिटींबरोबर देखील हीच गोष्ट घडली आहे. जेव्हा लोक लैंगिक छळाबद्दल बोलतात, तुमच्याकडे नाही म्हणण्याचा पर्याय देखील आहे. तुम्ही असं काहीही करणार नाही असं निक्षून सांगू शकता, अशा गोष्टी प्रत्येकाबरोबर घडतात." एकूणच हेमा कमिटीचा रिपोर्ट आल्यापासून सध्या चित्रपटसृष्टीमधील वातावरण थोडं गरम आहे.