मुंबई - रोहित शेट्टीचा बहुचर्चित आणि प्रतीक्षित 'सिंघम अगेन' चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहात असताना मराठी संगीतमय चित्रपट 'मानापमान'चा टिझर मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाल्यानं प्रेक्षकांना ही एक पर्वणी मिळाली आहे.
"कट्यार काळजात घुसली" चित्रपटाच्या उत्तुंग यशानंतर अभिनेता-दिग्दर्शक सुबोध भावे या भव्य संगीतमय चित्रपटासह दिग्दर्शनाकडे पुन्हा परतला आहे. चित्रपटाच्या पहिल्या टीझरचे आज लॉन्चिंग करण्यात आले. 'मानापमान'च्या टिझरमध्ये समृद्ध महाराष्ट्रीयन संस्कृतीचं दर्शन प्रेक्षकांना होत आहे.
या चित्रपटात सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शंकर-एहसान-लॉय या दिग्गज संगीत त्रिकुटाने चित्रपटाची 14 गाणी संगीतबद्ध केली असून 16 हून अधिक नामवंत गायकांनी ही गाणी गायली आहेत. मराठी नाटकाला नाट्यसंगीताची एक मोठी परंपरा आहे. अलीकडे अशी नाटकं पाहायलाही मिळत नाहीत. त्यामुळे मराठीतील अजरामर ठरलेल्या 'संगीत मानापमान'चा संगीतमय अनुभव देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे.
"आज, आमच्या मानापमान चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे, आणि मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी उत्सुक आहे. 'सिंघम अगेन' या बहुप्रतिक्षित चित्रपटाबरोबर प्रेक्षकांना टिझरचा अनुभव देऊ केल्याबद्दल जिओ स्टुडिओचे आभार. यामुळे बिगर-मराठी प्रेक्षकांनाही या टिझरचे साक्षीदार बनवण्याची आणि संगीताचं जग अनभवण्याची संधी मिळेल", असं सुबोध भावेनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या ११३ वर्ष जुन्या महाकाव्यापासून प्रेरित होऊन ''संगीत मानापमान'' या चित्रपटानं "कट्यार काळजात घुसली" आणि "डॉ. काशिनाथ घाणेकर" यांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. हा चित्रपट जबरदस्त व्हिज्युअल्स, अस्सल संगीत आणि समृद्ध कथाकथनासह प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी सज्ज झाला आहे. शिरीष गोपाळ देशपांडे यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. जिओ स्टुडिओसाठी ज्योती देशपांडे यांची निर्मिती असलेला हा चित्रपट सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केला असून यामध्ये सुबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी आणि इतर प्रतिभावान कलाकार आहेत. हा संगीतमय चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.