मुंबई - हल्ली बहुतांशी चित्रपट एकापेक्षा जास्त भाषांमध्ये रिलीज होताना दिसतात. हिंदी चित्रपट प्रामुख्यानं दाक्षिणात्य भाषांमध्ये डब करून साऊथ इंडियामध्ये प्रदर्शित केले जातात. आता 'मल्हार' नावाचा सिनेमा येऊ घातलाय जो मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या द्विभाषिक चित्रपटात तीन ट्रॅक्स असून त्यातून विविध नात्यांच्या नाना छटा, उदा. मैत्री, प्रेम, विश्वास सारख्या भावना, उलगडताना दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
'मल्हार' चित्रपटाचं कथानक गुजरातमधील कच्छच्या ग्रामीण भागात घडताना दिसेल. यात तीन वेगवेगळ्या कथा आहेत हे ट्रेलर मधून समोर येतं. लहान मुलांची मैत्री यावर एक कथानक बेतलेले आहे. दुसरी कथा एका तरुण युगुलांची असून तरूण-तरूणीचे एकमेकांवर असणारे प्रेम आणि त्यात येणारे अडथळे यावर भाष्य करणारी आहे. तसेच तिसऱ्या कथेत एक नवविवाहित जोडपे आणि त्यातील बायकोची, मूल होऊ शकत नसल्याने कुटुंबात होणारी परवड, यावर मतमतांतरे दर्शविणारी आहे. महत्वाचे म्हणजे या तीनही कथा भिन्न असल्या तरी त्यांचे धागे एकमेकांशी जुळणारे आहेत. चित्रपटात भावभावनांचा कल्लोळ असला तरी त्याला नर्मविनोदी ट्रीटमेंट देण्यात आली असून तो जास्तीतजास्त मनोरंजक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
प्रफुल पासड निर्मित 'मल्हार' ची प्रस्तुती व्ही मोशन तर्फे करण्यात आली आहे. दिग्दर्शन आणि लेखन विशाल कुंभार यांनी केले आहे. या चित्रपटात अंजली पाटील, शारीब हाश्मी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे, विनायक पोतदार, मोहम्मद समद, अक्षता आचार्य, रवी झंकाळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
'मल्हार' हा वेगळ्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट येत्या ७ जून २०२४ रोजी ‘मल्हार’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -