मुंबई - 'गीतमाला'चे आयकॉनिक रेडिओ सादरकर्ते आमिन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन मुंबईत निधन झाले. अमीन सयानी हे काही काळापासून उच्च रक्तदाब आणि वयोमानानुसार इतर आजारांनी त्रस्त होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
आकाशवाणीने एक ट्विट करुन ही माहिती देताना लिहिले, "महान रेडिओ सादरकर्त्यांपैकी एक, अमीन सयानी यांचे निधन झाले. ते लोकप्रिय रेडिओ शो “बिनाका गीत माला” चे प्रतिष्ठित प्रस्तुतकर्ता होते."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमिन सयानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे. "श्री अमीन सयानी जी यांच्या एअरवेजवरील सोनेरी आवाजात एक मोहकता आणि उबदारपणा होता ज्यामुळे ते पिढ्यानपिढ्या लोकांना प्रिय होते. त्यांच्या कार्यातून त्यांनी भारतीय प्रसारणात क्रांती घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांच्या श्रोत्यांशी एक अतिशय खास बंध जोपासला. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांचे कुटुंबीय, प्रशंसक आणि सर्व रेडिओ प्रेमींसाठी शोक. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.", असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या X वर म्हटले आहे.
रेडिओ सिलोन आणि नंतर ऑल इंडिया रेडिओच्या विविध भारतीवर सुमारे 42 वर्षे प्रसारित झालेल्या "बिनाका गीतमाला" या लोकप्रिय कार्यक्रमामुळे देशाच्या घराघरात पोहोचलेल्या अमिन सयानींच्या निधनाबद्दल सर्व थरातील देशवासियांकडून शोक व्यक्त केला जात आहे. दर आठवड्याला त्यांचा आवाज ऐकण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असत. ५४,००० हून अधिक रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती आणि व्हॉइस-ओव्हर करण्याचा विक्रम अमीन सयानी यांच्या नावावर आहे. सुमारे 19,000 जिंगल्ससाठी व्हॉईसओव्हर दिल्याबद्दल त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील नोंदवले गेले आहे.
हेही वाचा -