मुंबई Anupam Kher : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या मुंबईतील कार्यालयात चोरी झाली आहे. कार्यालयातील लेखा विभागातील तिजोरीसह चोरट्यांनी पलायन केलं. तसंच एका चित्रपटाचा निगेटिव्ह बॉक्सही त्यांनी सोबत नेलाय. याप्रकरणी अनुपम खेर यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. खुद्द बॉलिवूड अभिनेत्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून या घटनेची माहिती दिलीय.
स्वतः पोस्ट करत दिली माहिती : अनुपम खेर यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट टाकून कार्यालयातील चोरीची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "माझ्या वीरा देसाई रोडच्या ऑफिसमध्ये काल रात्री (बुधवार) दोन चोरट्यांनी माझ्या ऑफिसचे दोन दरवाजे तोडले आणि अकाउंट्स डिपार्टमेंटमधील संपूर्ण तिजोरी तसंच आमच्या कंपनीच्या एका बॉक्समधील निगेटिव्ह वस्तू चोरुन नेल्या. आमच्या कार्यालयानं एफआयआर दाखल केला आहे आणि पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की चोर लवकरच पकडले जातील. कारण दोघंही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सामानासह ऑटोमध्ये बसलेले दिसले आहेत. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो! हा व्हिडिओ पोलीस येण्यापूर्वी माझ्या ऑफिसच्या लोकांनी बनवला होता."
कोणत्या चित्रपटात दिसणार : अनुपम खेर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि वैयक्तिक तसंच व्यावसायिक जीवनाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत असतात. आता त्यांनी ही आश्चर्यकारक पोस्ट केली आहे. अनुपम खेर गेल्या 40 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. 1984 मध्ये आलेला 'सारांश' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. सध्या अनुपम खेर यांच्या खात्यात अनेक चित्रपट आहेत, हे येत्या काळात पाहायला मिळतील. ते 'मेट्रो इन दिन', 'इमर्जन्सी', 'फतेह सिंग', 'अलर्ट 24x7' मध्ये दिसणार आहे. या वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'कागज 2' या चित्रपटात ते दिसले होते.
हेही वाचा :