मुंबई - Thalapathy Vijay enters politics : साऊथ सुपरस्टार थलपथी विजयने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा एक मोठा धक्का दिला आहे. अभिनेता विजय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक हिट चित्रपट देणाऱ्या विजयने अखेर आपल्या चाहत्यांचे हे स्वप्न साकारले आहे. आज २ फेब्रुवारी त्याने रोजी सक्रिय भारतीय राजकारणात पहिले पाऊल टाकले आहे. देशाच्या लोकसभा निवडणूका 2024 मध्ये होत आहेत, या पार्श्वभूमीवर त्याने राजकारणात प्रवेश केल्याने तामिळनाडू राज्याच्या राजकारणात बरीच उलथापलथ होऊ शकते असे मानले जाते. मात्र 2026 मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि ही निवडणूक जिंकणे हेच विजयच्या नव्या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. राजकारणात प्रवेश करण्यासोबतच विजयने आपल्या पक्षाचे नावही जाहीर केले आहे. या बातमीने थलपथी विजयच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली असून ते त्याला शुभेच्छा देत आहेत.
विजयने आज, २ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून राजकारणात प्रवेश केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ''तमिझगा वेत्री कळघम' या आमच्या पक्षाची नोंदणी करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे अर्ज करत आहोत, आमचा उद्देश आगामी 2026 च्या विधानसभा निवडणुका लढवणे आणि जिंकणे आणि लोकांना हवे असलेले मूलभूत राजकीय बदल घडवून आणणे हा आहे.'
दाक्षिणात्य राजकारणावर फिल्म स्टार्सचा दबदबा - यापूर्वी तमिळनाडूच्या राजकारणात सिने अभिनेत्यांचा वरचष्मा राहिला आहे. एम जी रामचंद्रन, शिवाजी गणेशन, जयललीता यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करुन मोठा बदल घडवून आणला होता. आंध्र प्रदेशातही एनटी रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना करुन सत्ता हस्तगत केली होती. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत सुपरस्टार चिरंजीवी आणि पवन कल्याण या साऊथ स्टार्सनी राजकारात उडी घेतली पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. तामिळनाडूत यापूर्वी कमल हासनने पक्ष स्थापन करुन मोठी हवा निर्माण केली होती, परंतु त्यालाही यश मिळाले नव्हते. त्याचवेळी रजनीकांतनेही राजकारात येण्याची आणि पक्ष स्थापना करण्याची घोषणा केली होती. परंतु त्याची ही घोषणा हवेतच विरली होती. यापार्श्वभूमीवर आता थलपती विजय आपला राजकारणात हात आजमावत आहे. त्याला कितपत यश मिळणार हे येणारा काळ ठरवेल.
हेही वाचा -