मुंबई - गायक-संगीतकार शंकर महादेवन यांना सध्या गगन ठेंगणं झालंय. त्यांचा आणि तबला वादक झाकीर हुसैन यांच्या फ्यूजन बँड 'शक्ती'ने ग्रॅमी 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार जिंकला आहे. लॉस एंजेलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा अलिकडेच पार पडला.
गुरुवारी भारतात आल्यावर शंकर महादेव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "माझ्यासाठी आणि माझ्या बँड मेंबर्ससाठी हा खूप खास क्षण आहे... माझ्यासाठी हे एक स्वप्न पूर्ण झाले आहे... 25 वर्षे दौरे केल्यानंतर आम्हाला हा ग्रॅमी पुरस्कार मिळाला..."
शंकर महादेवन यांनी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले ज्यामध्ये ते ग्रॅमी अवॉर्डसह पोज देताना दिसत आहेत. त्यांनी एक कृतज्ञता व्यक्त करणारी एक चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये ते म्हणतात, "आम्ही हे करुन दाखवले. मी कधीही कल्पना केली नव्हती की ज्या बँडमधून मी माझे संगीत आणि माझे संगीत सौंदर्यशास्त्र शिकलोय त्या बँडसह मी परफॉर्म करेन आणि ग्रॅमी जिंकू शकेन. हाच तो क्षण आहे ज्याला मी माझे स्वप्न सत्यात उतरले असे म्हणू शकतो. हे घडवून आणल्याबद्दल सर्वशक्तिमान इश्वाराचे आभार! हा खरोखर हा एक खास क्षण आहे."
ग्रॅमी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात शंकर महादेव म्हणाले, "सर्व सहकाऱ्यांचे आभार. देवाचे, कुटुंबाचे, मित्रांचे आणि भारताचे आभार. मला भारताचा अभिमान वाटतो." देशाबद्दलचा अभिमान व्यक्त केल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी मोठा जल्लोष केला. शंकर महादेवन यांनी पत्नीला सतत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.
"शेवटी मी इतकंच सांगेन, मी हा पुरस्कार माझ्या पत्नीला समर्पित करू इच्छितो जिच्यासाठी माझ्या संगीतातील प्रत्येक नोट समर्पित आहे," असं ते पुढं म्हणाले.
ग्रॅमी पुरस्कार विजेत्या या शक्ती बँडच्या टीममध्ये गिटार वादक जॉन मॅक्लॉफलिन, तालवादक व्ही सेल्वागणेश आणि व्हायोलिन वादक गणेश राजगोपालन यांचाही समावेश आहे. ग्रॅमी पुरस्काराच्या नामांकनाच्या शर्यतीत शक्ती बँडने सुसाना बाका, बोकांटे, बर्ना बॉय आणि डेव्हिडो सारख्या इतर कलाकारांसोबत स्पर्धा केली. 'धिस मोमेंट' हा अल्बम गेल्या वर्षी ३० जूनला रिलीज झाला होता. सोमवारी लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम एरिना येथे ग्रॅमीजचा 66 वा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा -