मुंबई - Soha Ali Khan : सैफ अली खान हा पतौडीचा नवाब आहे, हे अनेकांना माहित आहे. फिल्मस्टार बनलेल्या पतौडी घराण्यातील कलाकार आजही लोकांना खूप आवडतात. सैफ अली खानपासून तर सारा अली खानपर्यंतचे कलाकार आजही लोकप्रिय आहे. आता नवाब घराण्याची मुलगी सोहा अली खाननं पतौडी पॅलेसबाबत एक रंजक खुलासा केला आहे. सोहानं सायरस ब्रोचाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, 'मला आठवते की माझी आई हिशोब घेऊन बसायची. घरचा आणि महिन्याचा खर्च याचा हिशोब तिला ठेवावा लागत होता. कठीण काळात तिनं घर सांभाळलं आहे. त्यामुळेच पॅलेसला पांढरा रंग देण्यात आला. कारण हा रंग महाग होता. आम्ही बरेच दिवस काहीही खरेदी केले नाही. मात्र या ठिकाणाचे सौंदर्य तुम्हाला भुरळ घालते.'
सोहा अली खाननं केला खुलासा : तिनं पुढं सांगितलं, 'जेव्हा माझे आजोबा पतौडी पॅलेस बनवत होते, तेव्हा त्यांचे खिसे रिकामे झाले होते. या कारणास्तव पॅलेसमध्ये अनेक ठिकाणी संगमरवराऐवजी गालिचा टाकण्यात आला आहे. आजही माझी आई पॅलेसच्या प्रत्येक खर्चाची नोंद ठेवते. एवढेच नाही तर पॅलेसचं रंगकाम करण्याऐवजी व्हाईटवॉशिंग केले जाते. कारण, ते कमी खर्चिक आहे. अनेक वर्षांपासून तेथे नवीन काहीही झालेले नाही. राजवाड्याची वास्तुकला अतिशय सुंदर आहे. ही वास्तुकला प्रत्येकाला आकर्षित करते.' यानंतर तिनं पुढं सांगितलं की, 'जनरेटर रूमच्या देखभालीसाठी मी पैसे देते. कारण ती माझी वास्तू आहे. हा पॅलेस एका हॉटेलला भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. यावेळी माझे आई आणि वडील तिथे राहात होते. तेव्हा जनरेटर रूमचे रूपांतर 2 बेडरूमचा हॉल आणि किचनमध्ये करण्यात आले होते.' आता सैफ अली खाननं हॉटेलसोबतचा करार रद्द केला आहे.
सोहा राजकुमारी बनली नाही : सोहानं पतौडी पॅलेसच्या इतिहासाविषयी म्हटलं, 'सैफचा जन्म 1970 मध्ये झाला असल्यानं तो राजकुमार झाला. 1970 मध्ये रॉयल पदव्या रद्द करण्यात आल्या होत्या. माझा जेव्हा जन्म झाला, तेव्हा शाही पदव्या मिळत नव्हत्या. माझा भाऊ राजकुमार आहे, या पदानुसार एक मोठी जबाबदारी येते. माझी आजी भोपाळची बेगम होती. माझे आजोबा पतौडीचे नवाब होते.' पतौडी पॅलेस सैफ अली खानचे आजोबा नवाब इफ्तेखार अली यांनी बांधला होता. यानंतर सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान यांच्या नावावर हा पॅलेस झाला. आता या पॅलेसचा मालक हा सैफ अली खान आहे. या पॅलेसमध्ये 150 हून अधिक खोल्या आहेत. पतौडी पॅलेस हा 10 एकर क्षेत्रात पसरलेला आहे. सध्या पतौडी पॅलेस खान कुटुंबासाठी फार्म हाऊससारखा आहे.