मुंबई - Manoj Joshi and Sukanya Mone : अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शिका अशा आपल्या विलक्षण कलागुणांनी मनोरंजन विश्वात चौफेर वावरणाऱ्या कांचन अधिकारी एक अत्यंत वेगळा विषय असलेला चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एका गाजलेल्या सत्यघटनेवरून प्रेरित होऊन त्यांनी 'जन्मऋण' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा विषय प्रेक्षकांच्या हृदयात सखोल रुजविण्यासाठी अत्यंत वेगळं कास्टिंग त्यांनी निवडलंय. प्रेक्षकप्रिय ठरलेल्या 'आभाळमाया' या लोकप्रिय मराठी मालिकेतील सुधा जोशी म्हणजे सुकन्या मोने आणि शरद जोशी अर्थात मनोज जोशी हे मालिकेत विभक्त झालेलं जोडपं दोन दशकांहून अधिक कालावधीनंतर 'जन्मऋण' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना सामोरं येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचं स्मरणरंजन घडून येणार आहे, हे नक्की.
मूल जन्माला येताना आई आणि मुलातील नाळ कापली जाते आणि तिथेच त्या बालकाचं भूतलावावर स्वतंत्र अस्तित्व सुरु होतं. नाळ कापली तरी आई-बापाचं मुलांप्रतीचं प्रेम मात्र कधीच कमी होत नाही. पण मुलं मोठी झाली की पालकांची संपत्ती, मालमत्ता किती आहे याचा विचार करताना दिसतात. पालक मात्र यापासून अनभिज्ञ असतात. जेव्हा मुलांना पालकांच्या अस्तित्वापेक्षा त्यांच्या मालमत्तेचा मोह पडतो तेव्हा काय होतं? पालकांनी अशावेळी काय करावं? मुलांमध्ये होणारे बदल कसे ओळखावे? नातेसंबंधाकडे कोणत्या दृष्टीने पहावे? बदलत्या काळानुसार त्याची पावलं कशी ओळखावी? याच विषयावर आधारित "जन्मऋण" या चित्रपटाची संवदनशील कथा आहे.
अजूनही प्रेक्षकांच्या मनात 'आभाळमाया'चं गाणं रुंजी घालतंय, पुन्हा एकदा मनोज जोशीसह एकत्र काम करताना काय भावना आहेत, असे विचारले असता सुकन्या मोने म्हणाल्या, "1999 ला या मालिकेला सुरुवात झाली होती. या मालिकेला प्रेक्षकांची अफाट माया मिळाल्यानं याचे दुसरं पर्वही आलं होतं. अडीच दशकानंतर मनोज जोशीसह एकत्र काम करताना खूप मजा आली. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. 'जन्मऋण' हा चित्रपट 15 मार्चला रिलीज होणार आहे."
सुकन्या मोने या मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात व्यग्र अभिनेत्रींपैकी एक आहेत. अलिकडेच केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात त्या झळकल्या होत्या. यातील त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी खूप कौतुकही केलं होतं. आगामी काळात एप्रिल वगळता प्रत्येक महिन्यात त्यांचा एक चित्रपट रिलीज होणार आहे. बालकलाकार म्हणून मराठी रंगभूमीवर कारकीर्द सुरु करणाऱ्या सुकन्या मोने कारकिर्दीच्या या टप्प्यावरही आपल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आपलं 100 टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल त्या उत्साहात बोलतात. "एका नामांकित वर्तमानपत्राच्या वतीने दिला जाणारा नवराष्ट्र हा पुरस्कार 'बाईपण भारी देवा'साठी मला मिळाला आहे. माझ्या 'बाई गं' या नव्या सिनेमाची घोषणाही नुकतीच झाली आहे. आम्ही 'बाई गं' हा चित्रपट अलीकडेच लंडनमध्ये पूर्ण केला होता. तो जून महिन्यात रिलीज होतोय. 'नाच गं घुमा' हा मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांचा चित्रपट 1 मे रोजी रिलीज होतोय आणि 'जन्मऋण' हा चित्रपट 15 मार्चला रिलीज होणार आहे." त्यांच्या प्रत्येक शब्दातून उत्साह ओसंडून वाहत असतो.
श्री गणेश फिल्म्स निर्मित आणि श्री अधिकारी ब्रदर्स प्रस्तुत 'जन्मऋण' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, धनंजय मांद्रेकर, तुषार आर.के., अनघा अतुल आणि खास भूमिकेत पाहुणे कलाकार म्हणून हिंदी मालिका - चित्रपटातील अभिनेता महेश ठाकूर यांनी काम केले आहे. अनुभवी डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून 'जन्मऋण'चं सौंदर्य अधिकच खुलवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. रसिकांच्या लाडक्या वैशाली सामंतनं या चित्रपटाचं संगीत सुमधूर करण्याचा तर 'हरफनमौला' सुदेश भोसलेनं आपल्या आवाजाच्या जादूने यातली गीतं बहारदार करण्याचा प्रयत्न केलाय.
कांचन अधिकारी यांनी खूप काळानंतर दिग्दर्शनात परतल्या आहेत. 1995 साली ‘दामिनी’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेच्या दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी 'मानिनी’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटानंतर ‘तुक्या तुकविला नाग्या नागविला’, ‘दोन घडीचा डाव’, ‘मोकळा श्वास’ अशा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तसंच ‘चोरावर मोर’ यासारख्या काही मराठी मालिकांचंही दिग्दर्शन केले आहे. टीव्हीवरील वृत्त निवेदिकेपासून त्यांनी सुरू केलेला प्रवास नाटक, टीव्ही मालिका, चित्रपट अशा सर्व अव्याहतपणे सुरू आहे. 'जन्मऋण' या नव्या दर्जेदार चित्रपटाकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत.
हेही वाचा -