मुंबई : निर्माता करण जोहरच्या पहिल्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'कुछ कुछ होता है' चित्रपटाला 26 वर्षे पूर्ण झाले आहेत. हा चित्रपट 16 ऑक्टोबर 1998 रोजी प्रदर्शित झाला होता. 'कुछ कुछ होता है' चित्रपट रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामधील प्रत्येक पात्र, गाणी आणि संवाद आजही खूप लोकप्रिय आहेत. शाहरुख, काजोल आणि राणी मुखर्जीची पडद्यावरची राहुल, अंजली आणि टीना ही पात्र अनेकांना आवडली होती. दरम्यान आम्ही आज तुम्हाला या चित्रपटाविषयी काही विशेष गोष्ट सांगणार आहोत. 'कुछ कुछ होता है'च्या पडद्यामागची कहाणी खूप वेगळी आहे.
'कुछ कुछ होता है' चित्रपटाला 26 वर्ष पूर्ण : टीनाच्या भूमिकेसाठी राणी मुखर्जी पहिली पसंती नव्हती. याआधी ही भूमिका अभिनेत्री ट्विंकल खन्नाला ऑफर करण्यात आली होती. पण काही कारणामुळे तिला या चित्रपटामध्ये घेण्यात आले नाही. याशिवाय तब्बू, शिल्पा शेट्टी, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या राय बच्चन, रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांनी ही भूमिका करण्यास नकार दिला होता. 'कुछ कुछ होता है' चित्रपटात काजोलनं टॉमबॉयची भूमिका साकारली होती, जी लोकांना खूप आवडली होती. या भूमिकेसाठी काजोलही पहिली पसंत नव्हती. ही भूमिका प्रथम जूही चावलाला ऑफर करण्यात आली होती. यानंतर काही कारणामुळे गोष्टी बदलविण्यात आल्या. काजोलला या भूमिकेसाठी फायनल करण्यात आलं.
सलमाननं स्वत:ला वेड असल्याचं म्हटलं : करण जोहरनं या चित्रपटाबाबत खुलासा केला की, "सर्वात मोठी समस्या सलमान खानच्या भूमिकेसाठी अमानची होती. मी अनेक अभिनेत्यांना ही भूमिका ऑफर केली होती, मात्र शाहरुख मुख्य भूमिकेत असल्यानं कोणीही याला स्वीकारत नव्हते. त्यानंतर मी एका पार्टीत सलमानला भेटलो, जेव्हा मी त्याला या गोष्टीबाबत सांगितलं, तेव्हा त्यानं म्हटलं, एक वेडा असावा जो ही भूमिका करेल, तो वेडा मी आहे. तेव्हा मला खूप आनंद झाला आणि जेव्हा हा चित्रपट हिट झाला, तेव्हा मी त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या घरी गेलो." रिपोर्ट्सनुसार, ही भूमिका सैफ अली खानलाही ऑफर करण्यात आली होती.