नवी दिल्ली Binny Bansal Resigns From Flipkart : ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच फ्लिपकार्टवर 16 वर्षांपासून सुरू असलेलं बन्सल युग आता संपलं आहे. फ्लिपकार्ट वॉलमार्टला विकल्यानंतर 2018 ला सचिन बन्सल कंपनीपासून वेगळे झाले होते. आता बिन्नी बन्सल यांच्या राजीनाम्यानं एका युगाचा अंत झालाय, असं म्हणणं चूकीचं ठरणार नाही. बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी 2007 मध्ये एका छोट्याशा खोलीतून 'फ्लिपकार्ट' हे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म सुरू केलं होतं.
राजीनामा देण्यामागचं कारण काय : बिन्नी बन्सल हे सध्या सिंगापूरमध्ये आहे. त्यांनी ई-कॉमर्स क्षेत्रातील आपल्या नवीन उपक्रमामुळे अडचणी येत असल्याचं सांगत आठवड्याच्या सुरुवातीलाच राजीनाम्याबद्दल बोर्डाला सांगितलं. बिन्नी बन्सल यांनी 'OppDoor' नावाच्या एका नवीन ईकॉमर्स स्टार्टअपची सुरूवात केली आहे. तसंच बिन्नी बन्सल यांनी एका निवेदनात म्हटलंय की, "फ्लिपकार्ट मजबूत स्थितीत आहे. चांगली लीडरशिप असलेली टीम ही पुढं जाण्याचा एक स्पष्ट मार्ग आहे. कंपनी सक्षम हातात आहे. हे जाणून मी बाजूला होण्याचा निर्णय घेतलाय. माझ्या टीमला शुभेच्छा आहेत."
फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी शनिवारी (27 जानेवारी) एका निवेदनात सांगितलं की, "ही कंपनी भारतातील दुकानांची पद्धत बदलण्यासाठी कटिबद्ध असलेल्या टीमनं बनवलेल्या कल्पना आणि कठोर परिश्रमाचे परिणाम आहे. आम्ही बिन्नी बन्सल यांना त्यांच्या पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा देतो. भारतीय रिटेल इकोसिस्टमवर त्यांनी केलेल्या सखोल परिणामाबद्दल त्यांचं आभार."
OppDoor कंपनी नेमकं काय करणार? : बिन्नी बन्सल यांनी OppDoor ही कंपनी सुरू केली. ही कंपनी ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांचे कार्य जागतिक पातळीवर नेण्यास मदत करेल. ई-कॉमर्स कंपन्यांना डिझाईन, उत्पादन, मानव संसाधन आणि इतर सेवा प्रदान करेल. यामुळं कंपनी जगभरातील त्यांचे कार्य विस्तारण्यास सक्षम होतील. ही कंपनी सध्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, इंग्लंड, कॅनडा, जर्मनी, सिंगापूर आणि मेक्सिको येथील कंपन्यांवर लक्ष केंद्रित करेल.
हेही वाचा -