चंद्रपूर Women Protest In Heavy Rain : भद्रावती तालुक्यातील बरांज इथल्या केपीसीएल कोळसा कंपनीच्या विरोधात महिलांनी आंदोलन छेडलं आहे. कोळसा खाणीच्या तळाशी असलेल्या पाण्यात उतरुन या महिलांनी आंदोलन सुरू केलं आहे. कंपनी व्यवस्थापनाकडून लिखित आश्वासन मिळत नाही, तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्र घेतला आहे. अशातच शनिवारी रात्री पाऊस आणि गारपीट झाली. त्यावेळी देखील गारपीटीचा मारा सहन करत महिलांनी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्र घेतला आहे. त्यामुळं या महिला अजूनही कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड खाणीच्या तळाशी जाऊन आंदोलन करत आहेत.
59 दिवसांपासून महिलांनी पुकारलं उपोषण : भद्रावती तालुक्यातील बरांज मोकसा या गावचे पुनवर्सन न करता आणि प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) या कोळसा कंपनीने कोळसा उत्पादनाचे काम सुरू केले आहे. याचा संपूर्ण गावातून विरोध होतो आहे. गेल्या 59 दिवसांपासून येथील महिलांनी उपोषण पुकारले आहे. मात्र प्रशासनानं याची दखल घेतली नाही. यापूर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आंदोलकर्त्या महिला आणि कंपनीच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली. मात्र यात कुठलाही ठोस तोडगा निघाला नाही. प्रशासन आणि कंपनीकडून लिखित आश्वासन दिलं नाही म्हणून हे आंदोलन कायम ठेवण्यात आलं आहे.
25 महिला आंदोलनासाठी उतरल्या खाणीत : आज सकाळी अखेर आंदोलन करणाऱ्या महिलांनी टोकाचं पाऊल उचलत 200 फूट खोल कोळसा खाणीत आत्मदहनासाठी उतरल्या. एकूण 25 महिला या खाणीत वेगवेगळ्या ठिकाणी उतरल्या होत्या. यापैकी 15 महिलांनी कंपनी प्रतिनिधी आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींनी आश्वासन दिल्यानं त्यांनी शनिवारी हे आंदोलन मागं घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उर्वरित 10 महिलांनी आंदोलन मागं घेण्यास नकार दिला. जोवर लिखित आश्वासन मिळत नाही, तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली. कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांची पुन्हा भेट घेऊन चर्चा केली. मात्र यात कुठलाही तोडगा निघाला नाही. शनिवारी रात्री गारपीट झाली त्यानंतर पाऊस आला, तरीही या महिलांनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे. याबाबत केपीसीएल कंपनीचे अधिकारी शिवप्रसाद यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा :