चंदीगड- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या जुलाना मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. विनेश फोगट ही हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील बलाली गावची रहिवासी आहे. पण तिचे सासरचे घर जुलाना येथे आहे. याच मतदारसंघातून ती काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती.
विनेश फोगटनं कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी करून देश-विदेशात नाव कमावलं आहे. तत्कालीन भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजपाचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर ती प्रकाशझोतात आली. तिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्तीमध्ये आपल्या चमकदार कामगिरीनं भारतीयांचे मने जिंकली. मात्र, 100 ग्रॅम वजनामुळे ऑलिम्पिकची अंतिम फेरी खेळू शकली नव्हती. देशाला हमखास मिळू शकणारे ऑलिम्पिक पद हुकल्यानंतर तिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. तिच्याबद्दल जनतेत प्रचंड सहानुभूतीची लाट निर्माण झाली.
पहिल्याच निवडणुकीत मिळविलं यश- कुस्ती सोडल्यानंतर राजकारणात आलेली माजी कुस्तीपटू विनेश फोगटनं हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता ती आमदार म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटनं काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. विनेशची जनतेमधील प्रसिद्धी पाहून काँग्रेसनं तिला जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली. संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाच्या निकालाकडं लागलं होते. तिने मतदारसंघात मेहनत घेऊन प्रचार केला. तिला पहिल्याच निवडणुकीत यश मिळाल्यानं विनेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जुलाना मतदारसंघाचा इतिहास: जुलाना हा मतदारसंघ सोनीपत लोकसभा मतदारसंघात येतो. जुलाना जागेतून 2000 आणि 2005 मध्ये काँग्रेसचे शेर सिंह येथून निवडणूक जिंकले होते. 2009 मध्ये इंडियन नॅशनल लोक दलाचे परमिंदर सिंग येथून आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये जनतेने त्यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून दिले. पण 2019 मध्ये त्यांनी पक्ष बदलून भाजपकडून निवडणूक लढविल्यानंतर त्यांचा पराभव झाला. त्यावेळी जेजेपीचे अमरजीत धांडा येथून आमदार म्हणून निवडून आले. जेजेपी उमेदवार अमरजीत धांडा यांनी 2019 निवडणुकीत भाजपच्या परमिंदर सिंह यांचा पराभव केला होता.