वाराणसी Gyanvapi Case : वाराणसी जिल्हा न्यायालयानं बुधवारी हिंदूंच्या बाजूनं मोठा निर्णय दिला. हिंदू पक्षाला ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्यात आलाय. न्यायालयानं जिल्हा प्रशासनाला 15 दिवसांत बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
नोव्हेंबर 1993 पर्यंत पूजा केली जात होती : वाराणसीच्या ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तहखानामध्ये पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी करणाऱ्या शैलेंद्र कुमार पाठक यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी आदेश राखून ठेवला होता. ज्यावर आज निर्णय आला आहे. हे तळघर मशिदीच्या खाली आहे. आता येथे नियमित पूजा होईल. येथे काशी विश्वनाथ विश्वस्त मंडळातर्फे पूजा करण्यात येणार आहे. येथे नोव्हेंबर 1993 पर्यंत पूजा केली जात होती.
मुस्लिम पक्ष उच्च न्यायालयात जाणार : दुसरीकडे, मुस्लिम पक्षाचे वकील अखलाक अहमद यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलंय. यापूर्वीच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून हा आदेश देण्यात आला. याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. ज्ञानवापी प्रकरणात हिंदू बाजूचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, पूजा सात दिवसांत सुरू होईल. प्रत्येकाला पूजा करण्याचा अधिकार असेल.
हिंदू बाजूचा दावा काय : या प्रकरणात हिंदू बाजूचा दावा आहे की, नोव्हेंबर 1993 पूर्वी तत्कालीन राज्य सरकारनं व्यास तळघरातील पूजा थांबवली होती. ही पूजा पुन्हा सुरू करण्याचे अधिकार दिले पाहिजेत, अशी हिंदूंची मागणी आहे. त्याच वेळी, मुस्लिम बाजूनं प्रार्थनास्थळ कायद्याचा हवाला देत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयानं मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावत हिंदू बाजूनं निर्णय दिला.
बॅरिकेडिंग काढून टाकलं जाईल : न्यायालयाच्या आदेशानुसार 17 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनानं तळघराचा ताबा घेतला. एएसआयच्या सर्वेक्षणादरम्यान तळघर स्वच्छ करण्यात आलं. आता विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांनी पूजा करावी, असं जिल्हा न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटलंय. आदेशानुसार, आता वाराणसीचे जिल्हा दंडाधिकारी तळघराचे संरक्षक झाले आहेत. त्यामुळे विश्वनाथ मंदिराचे पुजारी ते तळघर स्वच्छ करून घेतील. तेथे लावलेलं बॅरिकेडिंग काढून टाकलं जाईल आणि त्यानंतर तळघरात नियमित पूजा केली जाईल.
हे वाचलंत का :