नवी दिल्ली Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प देशासमोर सादर केला. निवडणुकीचं वर्ष असल्यानं हा अंतरिम अर्थसंकल्प होता, असं असतानाही या अर्थसंकल्पातून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. साधारणपणे, कोणत्याही अर्थसंकल्पानंतर लोक काय स्वस्त झाले आणि काय महाग झालं हे सर्वात जास्त शोधतात. अर्थमंत्री सीतारामन यांच्या सुमारे तासाभराच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर तुम्हीही हे शोधत असाल, तर ही बातमी वाचा.
अर्थसंकल्पानंतर काहीच महाग किंवा स्वस्त नाही : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र, असं असूनही अंतरिम अर्थसंकल्पानंतर काहीही महाग किंवा स्वस्त होणार नाही. कारण या अर्थसंकल्पात अशा कोणत्याही घोषणा नाहीत. त्यामुळं अर्थसंकल्पानंतर देशात कोणतीही वस्तू महाग होईल किंवा स्वस्त होईल, असे चित्र नाही.
काय आहे कारण : देशात 1 जुलै 2017 रोजी वस्तू आणि सेवा कर (GST) लागू झाल्यानंतर, अर्थसंकल्पात काहीही महाग किंवा स्वस्त हे केवळ कस्टम ड्युटी किंवा एक्साईज ड्युटीमधील कोणत्याही बदलामुळं होतं. या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी उत्पादन शुल्क किंवा कस्टम ड्युटीवर काहीही बोललेलं नाही. यामुळं कोणतीही गोष्ट थेट महाग किंवा स्वस्त होणार नाही. अप्रत्यक्ष कर वाढल्यानं किंवा कमी झाल्यामुळं उत्पादनं स्वस्त आणि महाग होतात.
- 2023 च्या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी झाल्या होत्या स्वस्त : 2023 च्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर मोबाईल फोन, टीव्ही आणि टीव्हीचे सुटे भाग, इलेक्ट्रिक वाहनं, इलेक्ट्रिक कारची बॅटरी, हिऱ्याचे दागिने, खेळणी, कॅमेरा लेन्स, कपडे, बायोगॅसशी संबंधित वस्तू, लिथियम सेल्स, सायकल आदी गोष्टी स्वस्त झाल्या होत्या.
- 2023 च्या अर्थसंकल्पात कोणती गोष्टी झाल्या होत्या महाग : 2023 च्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सिगारेट, एक्स-रे मशीन, विदेशी किचन चिमणी, मद्य, छत्री, सोने, आयात केलेले चांदीचे दागिने, चांदीची भांडी, प्लॅटिनम, हिरा, कम्पाऊंडेड रबर आदी गोष्टी महाग झाल्या होत्या.
हेही वाचा :