देहराडून Devotee Died In Badrinath Accident : बद्रीनाथ दर्शन करुन परतणाऱ्या महिला भाविकांना भरधाव वेगातील टँकरनं चिरडल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात अकोल्याच्या दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना उत्तराखंडमधील श्रीकोट श्रीनगरमध्ये मंगळवारी रात्री घडली. या अपघातात तीन महिला गंभीर जखमी असून त्यांना श्रीनगर गढवाल इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ललिता हरीश तावरी ( वय 50 गोपाल जीन अकोला) आणि सरिता उर्फ गौरी नरेश ( वय 50, तिजकरा अकोला ) अशी मृत झालेल्या भाविकांची नावं आहेत. तर सारिका राजेश राठी (46), संतोषी धनराज राठी (45), मधुबाला राजेंद्र कुमार (54) अशी जखमी झालेल्या महिलांची नावं आहेत.
बद्रीनाथ धाम दर्शनावरुन परत येताना टँकरनं चिरडलं : अकोला इथले भाविक बद्रीनाथ इथं दर्शनासाठी गेले होते. त्यांच्यासमवेत काही अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील भाविकांचा समावेश होता. यावेळी बद्रीनाथ इथून परत येताना या भाविक महिला श्रीकोट इथल्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. मंगळवारी रात्री भाविक महिला हॉटेलबाहेर बसून बोलत होत्या. मात्र त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या टँकरनं या महिलांना चिरडलं. याबाबत माहिती देताना कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक होशियार सिंह पंखोली यांनी सांगितलं की, "श्रीनगरहून श्रीकोटच्या दिशेनं जाणारा पाण्याचा भरधाव टँकर नियंत्रणाबाहेर गेला. या टँकरनं प्रथम गायीच्या वासराला धडक दिली. त्यानंतर टँकर भिंत तोडून आत घुसून त्यानं महिला भाविकांना चिरडलं. टँकरखाली दोन महिला चिरडल्या गेल्या. या महिलांना जेसीबीच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं."
भरधाव टँकरनं घेतला दोन महिलांचा जीव : भरधाव टँकरनं ललिता तावरी (50) आणि सरिता उर्फ गौरी यांना चिरडलं तर इतर चार महिलांनाही धडक दिली. या भीषण अपघातात ललिता तावरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर सरिता उर्फ गौरी यांना श्रीनगरमधील गढवाल इथल्या बेस हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. इतर तीन महिलांवर उपचार सुरू असल्याची माहिती श्रीनगर गढवाल बेस रुग्णालयाचे डॉ अजय विक्रम यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगतिलं की, "एका महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. दोघींना किरकोळ दुखापत झाली. जखमी झालेल्या भाविकांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या तीन महिलांवर उपचार सुरू आहेत. तिघींनाही सौम्य फ्रॅक्चर झालं आहे."
हेही वाचा :