तामिळनाडू- सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडुचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील टिप्पणीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाषण स्वातंत्र्याचा हा दुरुपयोग नाही का? अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं स्टॅलिन यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात कर्नाटक, उत्तर प्रदेश, जम्मू आणि महाराष्ट्रात प्राथमिक गुन्हा दाखल असल्याचं स्टॅलिन यांचे वकील ए. एम. सिंघवी यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना सांगितलं. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की, तुम्ही कलम १९ (१) च्या अधिकाराचा दुरुपयोग करत आहात. तुम्ही कलम २५ चा अधिकाराचा दुरुपयोग करत आहात का? कलम ३२ चा योग्य उपयोग करत आहात का? सर्वोच्च न्यायालयानं स्टॅलिन यांचे वकील सिंघवी यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यावर सिंघवी यांनी युक्तीवादात म्हटलं की, स्टॅलिन यांना सर्व उच्च न्यायालयात जावे लागेल. त्यामुळे त्यांना त्रास होणार आहे. यावर न्यायाधीश दत्ता यांनी टिप्पणी करत म्हटले, मंत्री असताना त्यांना परिणाम माहित असणं गरजेचं आहे.
- सिंघवी यांनी युक्तीवादात म्हटले की, ती बैठक ही सार्वजनिक कार्यक्रमात नव्हे तर बंद दरवाज्याआड झाली होती. तसंच त्यांनी वेगवेगळ्या राज्यांतील गुन्हे एकत्र करण्याची विनंती केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयात येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
काय म्हणाले होते स्टॅलिन : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना, डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. स्टॅलिन म्हणाले होत, "'काही गोष्टी आपल्याला संपवल्या पाहिजेत. त्याचा फक्त आपण निषेध करू शकत नाही. डास, डेंग्यू, कोरोना आणि मलेरिया या अशा गोष्टींना विरोध नव्हे आपल्याला संपवायचं आहे. सनातन धर्मही असाच संपवायला हवा. त्यासाठी निषेध करणं पुरेसं होणार नाही."
महाराष्ट्रातही स्टॅलिन यांच्याविरोधात गुन्हा दाखल० तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे देशभरात पडसाद उमटले होते. याप्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम 153 अ, 295 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-