नवी दिल्ली Elon Musk : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क लवकरच भारत दौऱ्यावर येत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले एलॉन मस्क हे त्यांच्या भारत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खुद्द एलॉन मस्क यांनी बुधवारी रात्री X (पुर्वीचं ट्विटर) वर पोस्ट शेअर करून माहिती दिली.
भारतीय बाजारात टेस्लाला आणायची वाहनं : एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षभरात दोनदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. पण, एलॉन मस्क भारतातच पंतप्रधान मोदींना भेटण्याची ही पहिलीच वेळ असेल. एलॉन मस्कच्या या भेटीबाबत अनेक अटकळ बांधल्या जात आहेत. एलॉन मस्क आपली कंपनी टेस्ला भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहेत. टेस्लाचे इलेक्ट्रिक वाहन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या योजनेवर काम सुरू झालंय. टेस्ला ही जगातील इलेक्ट्रिक वाहनं बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. पण, टेस्लानं भारतीय बाजारात अद्याप कोणतंही मॉडेल लाँच केलेलं नाही. जगातील वाहनांची विक्री पाहता भारत ही या वाहनांसाठी तिसरी मोठी बाजारपेठ आहे. आता एलोन मस्कला त्यांची इलेक्ट्रिक वाहनं भारतीय बाजारात आणायची आहेत.
ईव्ही प्लांटवर 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याची शक्यता : टेस्लाचे अधिकारी या महिन्यात उत्पादन प्रकल्पांचं स्थान पाहण्यासाठी भारतात येऊ शकतात. टेस्लाच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. असं मानलं जातं की टेस्लाची टीम त्यांच्या प्रस्तावित प्लांटसाठी योग्य जागा शोधण्यासाठी अनेक राज्यांना भेट देऊ शकते. महाराष्ट्र आणि गुजरातनं टेस्लाला तिथं कारखाना उभारण्यासाठी जमिनीसह आकर्षक ऑफर दिल्या आहेत. याशिवाय तेलंगणा सरकारही ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणण्यासाठी बोलणी करत आहे. टेस्लाची टीम गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांना भेट देऊ शकते. टेस्लानं भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास अनेकांना रोजगार मिळू शकतो.
हेही वाचा :