हैदराबाद- तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोमवारी दुपारी रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन रामोजी राव यांची भेट घेतली. आदिलाबाद दौरा पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री हैदराबादला पोहोचले. यावेळी ते थेट रामोजी फिल्म सिटीमध्ये पोहोचले. मुख्यमंत्री रेड्डी आणि रामोजी राव यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. नवं सरकार आल्यानंतर तेलंगणाचा विकास आणि इतर धोरणांबाबत चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी रामोजी राव यांच्यासोबत देशातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी ईनाडुचे एमडी किरण, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार वेम नरेंद्र रेड्डी आणि इब्राहिमपटणमचे आमदार मालरेड्डी रंगा रेड्डीदेखील यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान हे मोठ्या भावासारखे - पंतप्रधान मोदींच्या हस्ते आदिलाबाद 56,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी आदिलाबाद येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठ्या भावासारखे म्हटले. ते म्हणाले, "नरेंद्र मोदीजी हे आमच्या मोठ्या भावासारखे आहेत. जर मोठ्या भावाचा पाठिंबा असेल, तरच मुख्यमंत्री आपल्या राज्यात विकास कामे पुढे नेऊ शकतात. तेलंगणाचा विकास गुजरात प्रमाणं करायचा असेल तर तुमचा पाठिंबा आवश्यक आहे. आंध्र प्रदेश राज्य पुनर्रचना कायद्यानुसार केंद्राला तेलंगणात 4,000 मेगावॅटचा वीज प्रकल्प सुरू करायचा आहे. मात्र, मागील बीआरएस सरकारच्या धोरणांमुळे गेल्या 10 वर्षांत केवळ 1,600 मेगावॅट पूर्ण झाले," अशी त्यांनी यावेळी टीका केली.
राज्यांच्या विकासातून देशाचा विकास - मेळाव्याला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, "एनडीए सरकारबरोबरच तेलंगणा राज्यानं 10 वर्षे पूर्ण केली आहेत. राज्यांच्या विकासातून देशाचा विकास होतो. चांगल्या अर्थव्यवस्थेनं देशावरचा विश्वास वाढतो. त्यातून राज्यांनाही गुंतवणूक मिळत असल्यानं फायदा होतो."
- काँग्रेसनं सत्ता आल्यानंतर गृह ज्योती योजनेंतर्गत तेलंगणात 200 युनिटपर्यंत मोफत वीज आणि महालक्ष्मी योजनेतून 500 रुपयांमध्ये स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर देण्याच्या योजनेला सुरुवात केली. त्यामुळे नव्या सरकारची ही योजना तेलंगणा राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
हेही वाचा-