इंफाळ(मणिपूर) Militants Attack on CM Convoy : कांगपोकपी जिल्ह्यात सोमवारी सकाळी काही संशयित दहशतवाद्यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला. पोलिसांनी सोमवारी या हल्ल्याची माहिती दिली.
पोलिसांनी सांगितलं की, "सोमवारी सकाळी 10.30 वाजता कोटलेन गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग-53 वर हल्ला झाला तेव्हा हा ताफा हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्याच्या दिशेने जात होता. सुरक्षा दलांच्या वाहनांवर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. याला पोलिसांनीही प्रत्युत्तर दिलंय. "
घृणास्पद हल्ल्यांचा तीव्र निषेध : राज्य आणि देशाच्या सेवेत रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा जवानांवर झालेल्या घृणास्पद हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो. शिजा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी सुरक्षा कर्मचाऱ्यांची भेट घेतली. जिरीबामच्या मार्गावर सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला होता, अशी प्रतिक्रिया मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी दिली.
सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू : ताफ्यातील एका वाहनाच्या चालकाच्या उजव्या खांद्यावर गोळी लागली. त्या कर्मचाऱ्याला इंफाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहेत आणि त्यांनी बंदूकधाऱ्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.