नवी दिल्ली SC Hearing on Sharad Pawar petition : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शरद पवारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता, के. व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर शरद पवार यांच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. 16 फेब्रुवारी रोजी, शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून व्हीप जारी केला जाऊ शकतो, असं सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं याचिकेची तातडीनं सुनावणी करण्याचं मान्य केलं होतं.
अजित पवार गटाला खऱ्या राष्ट्रवादीचा दर्जा : अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी असल्याचं निवडणूक आयोगानं 6 फेब्रुवारी रोजी जाहीर केलं होतं. निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला पक्षाचं निवडणूक चिन्ह घड्याळही दिलं होतं. शरद पवार यांनी शनिवारी (17 फेब्रुवारी) निवडणूक आयोग तसंच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणी दिलेला निर्णय अन्यायकारक असल्याचं म्हटलं होतं.
पक्षातून काढून टाकण्यात आलं : "ज्यांनी पक्ष काढला त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. न्यायालयीन व्यवस्थेनुसार हा निर्णय योग्य नव्हता." महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दावा केला होता की, त्यांच्या आदेशामुळं लोकशाही मजबूत होईल. तसंच घटनेच्या 10 व्या अनुसूचीवर चर्चा होईल. "मी घटनात्मक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसंच 10 व्या अनुसूचीतील तरतुदींच्या आधारे हा आदेश दिला आहे." मी माझ्या आदेशात त्यासंबंधीचे सर्व निर्णय नमूद केले आहेत, असं त्यावेळी नार्वेकर म्हणाले होते.
निवडणूक आयोग काय म्हणाले? : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय ECI नं असंही म्हटलं होतं की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट खरा राष्ट्रवादी पक्ष आहे. तसंच पक्षाचं नाव, घड्याळ चिन्ह वापरण्याचा अजित पवारांना अधिकार आहे. शरद पवार गटानं बहुमताचा दावा करण्यासाठी पक्षाची घटना, संघटनात्मक रचना निवडणूक आयोगाला सादर केली होती. परंतु पक्षाच्या खासदारांनी सादर केलेल्या समर्थन प्रतिज्ञापत्रांच्या आधारे आयोगानं अजित पवार गटाकडं बहुमत असल्याचं म्हणत शरद पवारांना धक्का दिला होता.
हे वाचलंत का :