बंगळुरु (कर्नाटक) Fine On Scooter Owner : बंगळुरु शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 50,000 रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यासाठी घरोघरी जाण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एका स्कूटर मालकानं 300 हून अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती आहे. त्याच्यावर 3.20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणात ठोठावला दंड : सुधामनगर येथील रहिवासी व्यंकटरमण यांच्या KA 05 KF 7969 क्रमांकाच्या स्कूटरवर तीनशेहून अधिक वाहतूक नियमभंगाची प्रकरणे होती. एसआर नगर, विल्सन गार्डन या विविध भागात हेल्मेट न घालणे, सिग्नल मोडून जाणे, वनवे असताना स्कूटर विरुद्ध दिशेनं चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी दंड ठोठावला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चालकाचा दंड भरण्यास तुर्तास नकार : वाहतूक पोलिसांनी व्यंकटरमण यांच्या घरी जाऊन त्यांना ३.२० लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. मात्र व्यंकटरमण यांनी यावेळी इतका दंड भरता येणार नसल्याचं सांगून पोलिसांना स्कूटर घेऊन जाण्यास सांगितलं. स्कूटर वापरू नका, दंड भरावा. अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वाराला नोटीस बजावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
अलीकडचं एक वेगळं प्रकरण : बंगळुरुमध्ये स्कूटीवरून प्रवास करताना 643 ट्रॅफिक उल्लंघनाचं प्रकरण नुकतंच समोर आलय. गेल्या दोन वर्षांत स्कूटरवरून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची ६४३ प्रकरणे नोंदवण्यात आली आहे. त्यात हेल्मेटशिवाय वाहन चालवल्याचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्कूटरच्या मालकाला ३.२२ लाख रुपयांचा दंड ठोठावला. स्कूटी क्रमांक KA04 KF9072 द्वारे वाहतुकीचं उल्लंघन केलं गेलं. बंगळुरुमधील गंगानगर येथील रहिवाशाच्या नावे ही दुचाकी होती.
- फोटो टिपून डिजिटल गुन्हे दाखल : गेल्या दोन वर्षांपासून एकच स्कूटी चालवून वेगवेगळ्या व्यक्तींनी नियमांचं उल्लंघन केलं होतं. शहरातील बहुतांश जंक्शनवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये नियमभंग करणाऱ्यांचे फोटो टिपून डिजिटल गुन्हे दाखल केले जात आहेत. आरटी नगर, तारालुबालूसह रस्त्यांवर ६४३ वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं.
हेही वाचा: