पाटणा : इंडिया आघाडीत नेतृत्वावरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिलाय. पाटणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, "युतीला पुढं नेण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते व्हायलाच हवं." तसंच आपण ममता बॅनर्जींच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ममता बॅनर्जींना लालू यादवांचा पाठिंबा : लालू प्रसाद यादव यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडं देण्याचं समर्थन केलं. ते म्हणाले, "मला वाटतंय ममता बॅनर्जींना आगामी काळात आघाडीचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी." त्याचवेळी काँग्रेसच्या विरोधाबाबत विचारलेल्या प्रश्नावर लालू यादव म्हणाले, "काँग्रेस आक्षेप का घेणार? त्यांच्या (ममता बॅनर्जी) नावाला कोणी विरोध करावा असं मला वाटत नाही."
"ठीक आहे, आम्ही नेतृत्व देऊ. आम्ही सहमत आहोत. काँग्रेस आक्षेप का व्यक्त करेल? होय, ममता बॅनर्जींना इंडिया आघाडीचं नेतृत्व दिलं पाहिजे." - लालू प्रसाद यादव, अध्यक्ष, राष्ट्रीय जनता दल
तेजस्वी यादव काय म्हणाले? : यापूर्वी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी कोलकाता येथे आलेले आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वावर म्हटलं होतं, "कोणताही वरिष्ठ नेता इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकतो, कोणाचाही आक्षेप नाही. पण ते सर्वसहमतीनं ठरवावं." तर याविषयी सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव म्हणाले, "इंडिया आघाडीच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल."
ममतांच्या नेतृत्वावर काँग्रेस काय म्हणाली? : ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचं नेतृत्व करणार का? या प्रश्नावर बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश सिंह म्हणाले, "त्यांचा (ममता बॅनर्जी) पक्ष टीएमसी आणि त्यांचं व्यक्तिमत्व इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याइतकं मोठं नाही. ते फक्त बंगालपुरतेच मर्यादित आहेत.'' तर यावर भाजपानं म्हटलंय, "इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबाबत संभ्रम आहे. त्यांच्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर कोणाचाच विश्वास नाही."
हेही वाचा -