हैदराबाद - भारतीय पत्रकारितेचे आयडॉल, चित्रपट क्षेत्रातील उत्तंग व्यक्तिमत्त्व आणि रामोजी फिल्म सिटीचे जनक, यशस्वी उद्योगपती अशा अनेक भूमिका रामोजी ग्रुपचे दिवंगत अध्यक्ष रामोजी राव यांनी बजावल्यात. त्यांनी केलेल्या कार्यानं अनेकांचं मनं जिंकलीत. त्यामुळे रामोजी रावांचा चाहतावर्गही मोठा आहे. रामोजी राव यांनी ईनाडू, ईटीव्हीमधील पत्रकारितेचा वापर जनहिताच्या कल्याणासाठी केलाय. फिल्म आणि मीडिया क्षेत्रात क्रांती घडवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे नाव आहे. रामोजी राव हे वृत्तपत्र स्वातंत्र्य, नावीन्य अन् प्रयोग यांच्यासाठी कायम कटिबद्ध राहिलेत, नेहमीच कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्यात.
रामोजी रावांचं उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय यश : रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील गुडीवाडाजवळील पेडापरुपुडी येथील शेतकरी कुटुंबात झाला. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही त्यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलं. मार्गदर्शी चिट फंड, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स, कलांजली शॉपिंग मॉल, प्रिया पिकल्स आणि मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स या कंपन्यांनी चांगलं नाव कमावलं. रामोजी राव यांना तेलुगु चित्रपट आणि मीडियामधील योगदानासाठी पद्मविभूषण (2016) पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. 8 जून 2024 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. बहुआयामी अन् चिरस्थायी वारसा मागे सोडत त्यांनी सर्वच क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलंय. अनेक दशकांच्या अथक प्रयत्नांमुळे रामोजी राव मनोरंजन क्षेत्राचे आधारवड ठरलेत, त्यांनी स्वप्नच खऱ्या आयुष्यात साकार करून दाखवलंय. चित्रपट सृष्टीत उल्लेखनीय कार्य करत त्यांनी भव्य अशी रामोजी फिल्म सिटीची हैदराबादमध्ये स्थापना केलीय. अनेक चित्रपटांचं शूटिंग रामोजी फिल्म सिटीत झालंय. आजही होत आहे. चित्रपट निर्माते असूनही रामोजी रावांनी पत्रकारितेप्रति आपली बांधिलकी कायम जपली. तसंच त्यांनी सामाजिक कार्यातही अमूल्य योगदान दिलंय. शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा ही आपली पार्श्वभूमी ते कधीच विसरले नाहीत. कायम जमिनीवर राहातच त्यांनी समाजातील दीन-दुबळ्यांसाठी सेवाकार्य केलंय.
रामोजी राव शब्द आणि कृतीतून कर्मयोगी : रामोजी राव हे आयुष्यभर कृतीशील आणि गतिमान व्यक्तिमत्त्व राहिलंय, त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये जसे की, मीडिया, सिनेमा, हॉस्पिटॅलिटी, आर्थिक सुरक्षा आणि अन्न उद्योगात त्यांच्या उल्लेखनीय कार्यानं अनेकांना जिंकून घेतलंय. ते एक दुर्मीळ द्रष्टे व्यक्तित्व होतं, जे स्वप्नांना सत्यात बदलण्याची ताकद ठेवत होते. रामोजी राव यांनी रामोजी फिल्मसिटी, ईनाडू वृत्तपत्र, ईटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून देशातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यवसाय आणि रोजगाराला चालना दिलीय. त्यांनी पत्रकारितेतील रुढीवाद झुगारून पारदर्शक पत्रकारितेची पायाभरणी केली. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात अनेक धाडसी पावलं उचलली. रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रामोजी राव यांनी मृत्यूपूर्वीच त्यांचं स्मारक तयार करून ठेवलं होतं. रामोजी फिल्मसिटीच्या विस्तीर्ण परिसरात त्यांनी बांधलेल्या स्मारकात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तेलंगणा सरकारनं अधिकृत समारंभांसह रामोजी राव यांच्यावर अंत्यसंस्कार केलेत.
एक बहुआयामी उद्योजक : रामोजी राव हे समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये लोकप्रिय होते. त्यांनी 1962 मध्ये मार्गदर्शी चिट फंड, 1974 मध्ये ईनाडू, 1980 मध्ये प्रिया फूड्स, 1980 मध्ये डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स, 1983 मध्ये उषाकिरण मूव्हीज, 1995 मध्ये ईटीव्ही चॅनेल्स, 1996 मध्ये रामोजी फिल्म सिटी, 1996 मध्ये रमादेवी पब्लिक स्कूलची स्थापना केली.
प्रेस स्वातंत्र्यासाठी एक धर्मयुद्ध : ईनाडूची स्थापना करणारे रामोजी राव 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीच्या वेळी प्रेसच्या सेन्सॉरशिपच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ईनाडू वृत्तपत्र 50 वर्षांच्या काळात विविध संघर्षांमध्ये सातत्याने लोकांच्या पाठीशी उभे राहिले. ईनाडू दैनिकानं सत्य, निष्पक्षता आणि न्याय पत्रकारितेच्या मापदंडाची स्थापना केलीय. अनेकदा प्रशासनाच्या चुकीच्या कारभारावर त्यांनी बोट ठेवलं. भ्रष्टाचाराबद्दल ईनाडूनं सातत्यानं आवाज उठवला. तसंच रामोजी रावांच्या नेतृत्वात देशातील लोकशाही मजबूत राहण्यासाठी ईनाडूनं मोठं योगदान दिलंय. रामोजी राव यांनी 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.
पत्रकारितेतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व : पाच दशकांहून अधिक काळ रामोजी राव यांनी वर्तमानपत्रे, मासिके आणि इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मची मोठी व्यवस्था उभारली होती. यामध्ये Eenadu तेलुगु दैनिक वृत्तपत्र, ETV, ETV भारत, अन्नदाता, बालभारत, चतुरा आणि विपुला यांचा समावेश आहे. 1974 मध्ये सुरू झालेले Eenadu दैनिक तेलुगू वाचकांच्या पसंतीचे वृत्तपत्र ठरले. रामोजी राव यांची अनेक दिग्गज राजकीय नेते, विचारवंतांनी कायमच प्रशंसा केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामोजी राव यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलंय आणि ते म्हणाले होते की, रामोजी समूहाच्या अध्यक्षांनी केवळ भारतीय माध्यमांमध्ये क्रांतीच घडवली नाही तर देशाच्या विकासाची तळमळही दाखवून दिली. रामोजी राव गारू यांना भारताच्या विकासाचा मोठा ध्यास होता. त्यांच्यासोबत संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या विद्वत्तेचा लाभ घेण्याच्या अनेक संधी मला लाभल्या याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानतो. या कठीण प्रसंगात त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि असंख्य चाहते यांच्यासोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. ओम शांति,” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्टवर म्हटलं होतं. रामोजी राव यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी ईनाडूचे व्यवस्थापकीय संचालक आणि रामोजी राव यांचे पुत्र चेरुकुरी किरण यांनी आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती शहराच्या बांधकामासाठी 10 कोटी रुपयांची मदत दिलीय.
ईनाडू जर्नालिझम स्कूलची स्थापन : रामोजी राव यांनी पत्रकारितेत अगणित प्रयोग केलेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ईनाडू तेलुगु पत्रकारितेतील प्रमुख आधारस्तंभ बनले. तरुणांना संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी ईनाडू जर्नालिझम स्कूलही सुरू केले होते. ईनाडू, ईटीव्ही, ईटीव्ही भारत, अन्नदाता, बालभारत, चतुरा आणि विपुला यांसारख्या असंख्य पेपर्स, मासिके आणि इलेक्ट्रॉनिक संस्थांद्वारे त्यांनी तरुण आणि वृद्ध, विद्यार्थी, मुले, महिला, शेतकरी इत्यादी लाखो वाचकांना आपलेसे करून घेतले.
ईनाडू सर्व तेलुगू वृत्तपत्रांमध्ये महत्त्वाचे ठरले : ईनाडू आणि रामोजी राव हे सामान्यजनांच्या हितासाठीच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे. त्यांनी अनेकदा सरकारच्या जनविरोधी कृतीवर आसूड ओढलेत. 2004 मध्ये वाय. एस. राजशेखर रेड्डी सरकारच्या काळात Eenadu दैनिकाने भ्रष्टाचारावर आवाज उठवला, वृत्तपत्रानं लोकांच्या मालकीची संसाधने नेत्यांच्या व्यक्तिगत फायदासाठी कशी वापरली जातात हे सांगितलं. त्यांनी विश्वासार्हतेला इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त स्थान दिलं, ज्यामुळे ईनाडू लाँच झाल्याच्या चार वर्षांत सर्व तेलुगु वृत्तपत्रांमध्ये महत्त्वाचे ठरले. 1984 च्या लोकशाहीच्या पुनरुज्जीवनातील प्रत्येक जनआंदोलनामागे ईनाडूचा हात होता. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत त्यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये ईटीव्ही चॅनेल स्थापन केले. रामोजी रावांनी ETV भारत ॲप 13 भारतीय भाषांमध्ये सुरू केले असून, न्यूज पोर्टल्ससह एकच एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलाय.
रामोजींच्या कार्यामुळे मिळत राहणार प्रेरणा : रामोजी राव हे उद्योजकतेबरोबर सामाजिक बांधिलकीसाठी ओळखले जात होते. त्यांनी शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रमांना मदत केली. त्यांनी अनेकांचे जीवन बदलून टाकले. रामोजी राव यांनी गुणग्राहकता दाखवून अनेक पत्रकारांना संधी देऊन घडवलं. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे देशाच्या कला क्षेत्रासह माध्यम क्षेत्राला चालना मिळाली. त्यांनी दूरदृष्टीनं सुरू केलेल्या विविध उद्योगांनी उत्तम सेवा आणि दर्जाचे नवीन मापदंड निश्चित केले. त्यांनी विविध क्षेत्रात उमटवलेला ठसा कायम राहणार आहे. त्यांचे कार्य भविष्यातील पिढ्यांना सतत प्रेरित करणार आहे.
लोकशाही पुन्हा स्थापित करण्याच्या चळवळीला पाठिंबा : 1983 मध्ये अस्थिर राजकीय वातावरणात त्यांनी तेलुगु देसम पक्षाला पाठिंबा दिला. पुढच्या वर्षी, केंद्राने एनटीआर सरकार उलथवून टाकल्यानंतर त्यांनी लोकशाही पुन्हा स्थापित करण्याच्या चळवळीला आवश्यक असलेला 'ऑक्सिजन पुरवठा' केला. त्यांनी जगप्रसिद्ध फिल्म सिटी उभारली आणि नंतर त्यांनी प्रमुख भारतीय भाषांमध्ये ईटीव्ही चॅनेल आणि नंतर ईटीव्ही भारत स्थापन केले. रामोजी रावांच्या जीवनातील साहसांमध्ये 2006 आणि 2022 मध्ये ईनाडू समूहाला उद्ध्वस्त करण्याच्या सरकारच्या कटाच्या विरोधात लढा फारच महत्त्वाचा आहे. ते नेहमी म्हणायचे, "निश्चय असेल तर केवळ आकाश हीच मर्यादा आहे". त्यामुळे त्यांची नम्रता सर्वकालीक टिकून होती. त्यांनी गाठलेल्या उंचीचा आणि सत्ताकेंद्रांशी असलेल्या जवळिकीचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर कोणताही प्रभाव पडला नाही.
आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात : नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी रामोजी ग्रुप ऑफ कंपनीज नेहमीच आघाडीवर राहिली. आपत्तीच्या प्रसंगी ते आपल्या धर्मादाय कार्यक्रमांतून लोकांच्या पाठीशी उभे राहिले. 'ईनाडू'च्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच त्यांनी आपला कार्यक्रम तयार केला, जेव्हा त्यांना किरकोळ नफा मिळत होता. त्यांनी 'ईनाडू रिलीफ फंड' लाँच केला जो नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या समुदाय आणि गावांच्या पुनर्बांधणीसाठी महत्त्वपूर्ण ठरलाय. 40 वर्षांत या निधीवर 100 कोटी रुपये खर्च झाले आहेत. एकट्या रामोजी फाऊंडेशनने लोककल्याणासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च केलेत. त्यांच्या निधनानंतर रामोजी ग्रुप ऑफ कंपनीने त्याच मार्गावर पाऊल ठेवलंय.
केरळ पूरग्रस्तांसाठी घरे बांधण्यासाठी मदत : पाकिस्तान सीमेवरील गुजरातच्या भूकंपात नुकसानग्रस्त कवडा गावाची त्यांनी पुनर्बांधणी केली. तसेच केरळ पूरग्रस्तांसाठी घरे बांधण्यासाठी मदत दिली. ईनाडू रिलीफ फंडाने आपत्तींदरम्यान आपली उपजीविका गमावलेल्या लोकांच्या जीवनात पुन्हा आशेचा किरण आणण्यात सक्रिय भूमिका बजावली. तामिळनाडूतील कुड्डालोर आणि नागापट्टीनम येथील सुनामीग्रस्तांना मदत करण्यात आलीय.रामोजी राव यांनी काही गावं दत्तक घेतली होती, तसेच आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी आणि तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील नागनपल्ली या गावांना 28 कोटी रुपये खर्चून आदर्श गावांमध्ये रूपांतरित केले. त्यांच्या इतर योगदान मोठ्या प्रमाणात दिलंय. कोविडदरम्यान रामोजी राव यांनी दोन तेलुगू राज्यांना 20 कोटी आणि तामिळनाडूला 1 कोटी रुपये दिले.
रामोजी फिल्म सिटी (RFC) - एक ड्रीम प्रोजेक्ट : रामोजी राव यांनी चित्रपट निर्माते, वितरक आणि स्टुडिओ मालक म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी बजावली. मयुरी, प्रतिघात, चित्रा आणि नुवेकवली या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले. रामोजी फिल्म सिटी (RFC) चित्रपट उद्योगासाठी एक केंद्रबिंदू बनले, जिथे बाहुबली, गजनी, चंद्रमुखी, रोबोट आणि पुष्पा यासह 3000 हून अधिक चित्रपट तयार केले गेले. सुट्ट्या, सण अन् विविध संस्थांच्या विशेष कार्यक्रमांदरम्यान अभ्यागतांचे मनोरंजन करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून RFC मनोरंजनाचे एक दोलायमान केंद्र म्हणून उदयास आलंय.
रामोजी राव यांचे जीवन एक पाठ्यपुस्तक : रामोजी राव यांनी त्यांच्या आयुष्यात दाखवलेलं समर्पण, धैर्य आणि संकटांना तोंड देण्याची क्षमता आजही सामान्य व्यक्तीला प्रेरणा देत आहे. आपण अडथळ्यांना संधींमध्ये आणि आव्हानांना यशात आणि अपयशांना विजयात कसं बदलू शकतो हे रामोजी रावांकडून पाहून समजते. ते सदैव राष्ट्राचे प्रेरणास्थान राहतील.
रामोजी राव यांच्या जीवनातील काही तत्त्वे:
- नेहमी उद्याचा विचार करा. कालवर विसंबून राहू नका.
- बदल अन् प्रगती हातात हात घेऊन चालतात. परिवर्तनानेच विकास शक्य आहे. विकास हवा असेल तर नवीन विचार करा.
- कितीही अडचणी आल्या तरी स्वतःचे आयुष्य आनंदानं जगा. कोणाच्याही मदतीची वाट पाहू नका.
- शिस्तीशिवाय यशाचं दुसरं कुठलं रहस्य नाही. त्याशिवाय कोणतीही प्रतिभा फुलू शकत नाही.
- एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची खरी संपत्ती म्हणजे विश्वासार्हता. त्याचे संरक्षण करा!
हेही वाचा..