राजस्थान (ढोलपूर) - ढोलपूर जिल्ह्यातील बाडी सदर पोलीस स्टेशन हद्दीत सुनीपूर गावाजवळ शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. स्लीपर कोच बसनं टेम्पोला धडक दिली. या भीषण अपघातात आठ मुलांसह अकरा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व मृतदेह ताब्यात घेतले. जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात ढोलपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे.
'बडी कोतवाली' पोलीस ठाण्याचे प्रभारी शिव लहरी मीना यांनी सांगितले की, बाडी शहरातील करीम कॉलनी गुमट मोहल्ला येथील रहिवासी नहनू आणि झहीर यांचे कुटुंबीय बरौली गावातील नातेवाईकांमधील एका कार्यक्रमात गेले होते. ते घरी परतत होते. रात्री सुनीपूर गावाजवळ स्लीपर कोच बसनं टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ मुलांसह अकरा जणांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये स्लीपर कोच बसचा चालक आणि वाहकाचाही समावेश आहे.
- अपघाताची माहिती मिळताच बाडी जिल्ह्याचे अतिरिक्त एसपी एडीएफ कमल कुमार जांगीड, बाडीचे उपजिल्हाधिकारी दुर्गा प्रसाद मीना, बाडीचे सर्कल ऑफिसर महेंद्र कुमार मीना, बाडी सदर पोलीस स्टेशनचे प्रभारी विनोद कुमार हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघाताच्या स्थितीचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनानं जखमींवर तातडीनं उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.
अपघातामधील तिघांची प्रकृती चिंताजनक- मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य टेम्पोनं घरी परतत असताना बाडीहून भरधाव वेगानं जाणाऱ्या स्लीपर कोच बसनं टेम्पोला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी एकच आक्रोश झाला. अपघात झाल्याचे पाहून महामार्गावरून जाणारे इतर वाहनचालक मदतीसाठी धावले. त्यांनी पोलिसांना महामार्गावरील अपघाताची माहिती दिली. अपघातामधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना धौलपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्याकरिता जात असताना वाटेतच एका महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात पाच मुले, तीन मुली, दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला.
- अपघातामधील मृतदेहांचे आज शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पोलिसांनी अपघातामधील बस आणि टेम्पो ताब्यात घेतले आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.
हेही वाचा-