वायनाड Rahul Gandhi Helicopter inspected : निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतील निलगिरीमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेतली. पोलिसांनी सांगितलं की, हेलिकॉप्टर इथं उतरल्यानंतर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. राहुल गांधी केरळमधील त्यांच्या वायनाड मतदारसंघात जात होते.
राहुल गांधींनी वायनाडमध्ये केला रोड शो : राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या सीमावर्ती भागातील निलगिरी जिल्ह्यातील कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यानंतर ते केरळमधील सुलतान बथेरी इथं पोहोचले. तिथं त्यांनी रोड शो केला. त्यांच्या रोड शोला शेकडो लोक उपस्थित होते. वायनाड मतदारसंघात त्यांचा सामना सीपीआयच्या नेत्या ॲनी राजा आणि भाजपाचे उमेदवार के सुरेंद्रन यांच्याशी होणार आहे.
भाषा ही लादलेली गोष्ट आहे : रोड शो दरम्यान राहुल यांनी तिथं उपस्थित लोकांना संबोधितही केलं. ते म्हणाले, "आमचा लढा प्रामुख्यानं आरएसएसच्या विचारसरणीशी आहे. भाजपा आणि पंतप्रधान म्हणतात की त्यांना एक राष्ट्र, एक निवडणूक, एक नेता, एक भाषा हवी आहे. भाषा ही लादलेली गोष्ट नाही. भाषा ही अशी गोष्ट आहे जी आतून येते. लोकांमध्ये तुमची भाषा हिंदीपेक्षा निकृष्ट आहे, असं म्हणणं म्हणजे भाषेचा अपमान करण्यासारखं आहे."
राहुल गांधी दुसऱ्यांदा आपल्या मतदारसंघात : काँग्रेस खासदार राहुल गांधी त्यांच्या वायनाड दौऱ्यात मनंथवाडी बिशप यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. संध्याकाळी राहुल गांधी कोझिकोड जिल्ह्यात सभेला संबोधित करतील. लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी दुसऱ्यांदा आपल्या मतदारसंघात आले आहेत.
प्रचाराला सुरुवात : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच यावेळी त्यांनी मोठा रोड शो करुन निवडणूक प्रचाराची सुरुवात केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी 4,31,770 मतांच्या विक्रमी फरकानं वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागांसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
हेही वाचा :