मालदा (पश्चिम बंगाल) Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. या दरम्यान एक मोठी घटना घडली. पश्चिम बंगालच्या मालदामध्ये राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला झाला. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे गाडीच्या काचा फुटल्या. काँग्रेसनं याला सुरक्षेतील त्रुटी म्हटलंय. सुदैवानं, या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही.
वाहनाच्या मागील खिडकीची काच फुटली : पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं की, 'राहुल गांधी ज्या वाहनातून प्रवास करत होते त्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये वाहनाच्या मागील खिडकीची काच फुटली." राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास सध्या पश्चिम बंगालमधून होतोय. रिपोर्ट्सनुसार हा हल्ला कोणी केला आणि त्याचा हेतू काय होता याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
प्रशासन काय म्हणालं : एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांचा ताफा मालदाच्या लाभा पुलाजवळ पोहोचला तेव्हा गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. काही वेळातच राहुल गांधी ज्या एसयूव्हीमध्ये बसले होते त्या एसयूव्हीची मागील काच पूर्णपणे फुटली. या घटनेवर काँग्रेस नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पक्षानं याला सुरक्षेतील त्रुटी म्हटलं. मात्र, या हल्ल्याबाबत स्थानिक प्रशासनानं अद्याप काहीही सांगितलेलं नाही. गर्दीमुळे काच फुटू शकते, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.
ममता बॅनर्जींची जाहीर सभा : आज (31 जानेवारी) मालदा येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे तेथे सुरक्षा व्यवस्थेबाबत दक्षता घेण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, या रॅलीसाठी अधिकाधिक सुरक्षा दल तैनात करण्यात आल्यानं राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी जास्त पोलीस उपस्थित नव्हते. पश्चिम बंगाल प्रशासनाचं आणखी एक वक्तव्य मीडियात आलं. त्यानुसार राहुल गांधींना मालदा येथील भालुका इरिगेशन बंगल्यात राहण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना आपल्या कार्यक्रमात बदल करावा लागला.
हे वाचलंत का :