नवी दिल्ली Parliamentary Committees Formation : केंद्र सरकारनं 2024-25 साठी 24 संसदीय स्थायी समित्यांची स्थापना केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारनं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची संरक्षण व्यवहार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना चार समित्यांचं अध्यक्ष करण्यात आलं असून, त्यात परराष्ट्र खात्याचाही समावेश आहे. प्रत्येक समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांचा समावेश असतो.
सोनिया गांधींचा समावेश नाही : काँग्रेस खासदार शशी थरूर यांना परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. तर, सपा खासदार राम गोपाल यादव हे आरोग्य समितीचे अध्यक्ष असतील. याशिवाय भाजपा खासदार राधामोहन सिंह संरक्षण व्यवहार समितीचे अध्यक्ष असतील. तर भाजपाचे भर्तृहरि महताब हे अर्थसंबंधित समितीचे अध्यक्ष असतील. मात्र, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कोणत्याही समितीत समावेश करण्यात आलेला नाही.
चार समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेसला : काँग्रेसला चार प्रमुख समित्यांचं अध्यक्षपद देण्यात आलय. यामध्ये शिक्षण, महिला, बालक, युवक आणि क्रीडा समितीचे अध्यक्ष दिग्विजय सिंह असतील. कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी असतील. तर ग्रामीण आणि पंचायती राज समितीचे अध्यक्ष सप्तगिरी शंकर उलाका असतील.
भाजपा नेत्यांकडं कोणत्या जबाबदाऱ्या? : भारतीय जनता पक्षाचे नेते राधामोहन दास अग्रवाल यांना गृह व्यवहार समितीचे अध्यक्ष बनवण्यात आलय. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्याकडं कम्युनिकेशन आणि आयटी समितीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मंडीतील भाजपा खासदार कंगना रणौत यांनाही या समितीचं सदस्य बनवण्यात आलं आहे. तसंच मेरठचे भाजपा खासदार अरुण गोविल हे परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य असतील. भाजपा नेते सीएम रमेश यांची रेल्वे मंत्रालय व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि राजीव प्रताप रुडी यांना कोळसा, खाणी आणि पोलाद तसंच जलसंपत्तीशी संबंधित समित्यांचं अध्यक्षपद देण्यात आलंय. वाणिज्य समितीचे अध्यक्ष टीएमसी नेते डोला सेन असतील. डीएमकेचे तिरुची शिवा हे उद्योग संबंधित पॅनेलचे अध्यक्ष असतील. या समितीकडं भारताच्या वाणिज्य क्षेत्राशी संबंधित वाणिज्य, व्यापार धोरण आणि आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर पर्यवेक्षण प्रदान करण्याचं काम सोपवण्यात आलय.
श्रीरंग बारणे आणि सुनील तटकरेंकडंही जबाबदारी : कम्युनिकेशन आणि आयटी विषयक समितीमध्ये वरच्या सभागृहातून सपाच्या जया बच्चन, SS-UBT च्या प्रियांका चतुर्वेदी, BJD चे सुष्मित पात्रा आणि काँग्रेसचे KTS तुलसी यांच्यासह भाजपाचे खासदार अनिल बलुनी, कंगना रणौत, टीएमसीच्या महुआ मोईत्रा यासह इतर लोकसभेच्या सदस्यांचा समावेश आहे. टीडीपी आणि जनता दल (युनायटेड) या भाजपाच्या प्रमुख मित्रपक्षांव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील त्यांचे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एका समितीचे नेतृत्व करतील. ऊर्जा समिती शिवसेनेचे श्रीरंग बारणे, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समिती टीडीपीचे मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी आणि पेट्रोलियम, नैसर्गिक वायू समितीची जबाबदारी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्याकडं सोपवण्यात आली आहे.