नवी दिल्ली PM Narendra Modi in Parliament : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, "जेव्हा राष्ट्रपती संसदेच्या या नवीन इमारतीत आम्हाला संबोधित करण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी ज्या अभिमानानं आणि आदरानं सेंगोल आणि संपूर्ण मिरवणुकीचं नेतृत्व केलं, तेव्हा आम्ही सर्वांनी त्याचं अनुसरण केलं. जेव्हा नवीन सभागृहात ही नवीन परंपरा भारताच्या स्वातंत्र्याच्या त्या पवित्र क्षणाचं प्रतिबिंब पाहते, तेव्हा लोकशाहीची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढते."
विरोधकांवर जोरदार निशाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, "विरोधक किती काळ समाजात फूट पाडणार? विरोधकांच्या या अवस्थेला काँग्रेस जबाबदार आहे. देशाला चांगल्या विरोधी पक्षाची नितांत गरज आहे. इतक्या वर्षात विरोधी पक्षनेता बदलू शकले नाही, देशाला घराणेशाहीचा फटका बसलाय. काँग्रेसचं दुकान टाळं ठोकण्याच्या मार्गावर आहे. विरोधक दीर्घकाळ विरोधातच राहणार आहेत. जशी मेहनत घेणार, तसंच फळ मिळणार. दशकभर विरोधी बाकावर बसण्याचा विरोधकांचा संकल्प आहे. काँग्रेसकडे संधी होती, मात्र अयशस्वी ठरले. एकच प्रॉडक्ट वारंवार लाँच करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकमेकांवर विश्वास ठेवायचा नाही, मग देशानं कसा विश्वास ठेवायचा.
मोदींची नेहरु आणि इंदिरा गांधींवरही सडकून टीका : पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, "माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी लाल किल्ल्यावरुन सांगितलं होतं की, भारताला सहसा कठोर परिश्रम करण्याची सवय नसते. युरोप, जपान, चीन, रशिया आणि अमेरिका जेवढं काम करतात तेवढं आपण करत नाही. नेहरुंचा भारतीयांबद्दलचा दृष्टिकोन असा होता की भारतीय आळशी होते." ते पुढं म्हणाले की, "इंदिरा गांधींची विचारसरणी जवाहरलाल नेहरुंपेक्षा फारशी वेगळी नव्हती. त्या लाल किल्ल्यावरुन म्हणाल्या होत्या, दुर्दैवानं आपली सवय अशी आहे की, जेव्हा काही शुभ कार्य पूर्ण होणार असते तेव्हा आपल्याला आत्मसमाधानाची भावना येते आणि कोणतीही अडचण आली की आपण हताश होतो."
काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर मोदींचा घणाघात : पंतप्रधान मोदी संसदेत म्हणाले की, "आम्ही 17 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन दिले आहेत. काँग्रेसच्या गतीनं गेलो तर हे काम पूर्ण व्हायला अजून 60 वर्षे लागतील. धुरात स्वयंपाक करताना तीन पिढ्या निघून जातील. काँग्रेसच्या मानसिकतेमुळं देशाचं मोठं नुकसान झालंय. काँग्रेसचा देशाच्या ताकदीवर कधीच विश्वास नव्हता, त्यांनी स्वतःला राज्यकर्ते मानलं आणि जनतेला कमी लेखलं." आज देशात ज्या वेगानं काम सुरू आहे, त्याची काँग्रेस सरकार कल्पनाही करू शकत नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. "आम्ही गरीबांसाठी 4 कोटी घरं बांधली, त्यापैकी 80 लाख पक्की घरं शहरी गरिबांसाठी बांधली. काँग्रेसच्या गतीनं काम झालं असतं तर एवढं काम पूर्ण व्हायला 100 वर्षे 100 पिढ्या लागल्या असत्या", असं म्हणत त्यांनी कॉंग्रेसवर टीका केलीय.
तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची मोदींना गॅरंटी : तिसऱ्यांदा सत्तेत परतण्याचा विश्वास व्यक्त करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, "2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 चा आकडा पार करेल. आमच्या सरकारची तिसरी टर्म आता फार दूर नाही. मी देशाचा मूड पाहिलाय. यामुळं एनडीए 400 च्या पुढं जाईल आणि भाजपला निश्चितपणे 370 जागा मिळतील."
हेही वाचा :