नवी दिल्ली Political Reaction On NEET PG Exam : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘नीट-पीजी’ परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी (22 जून) दिली. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, 23 जूनला ही परीक्षा होणार होती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून रविवारची (23 जून) परीक्षा रद्द करण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलंय. यावरुन आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
राहुल गांधी यांचे गंभीर आरोप : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मोदी सरकारवर निशाणा साधलाय. ते म्हणालेत की, "आता ‘नीट-पीजी’ परीक्षादेखील पुढं ढकलण्यात आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीत उद्ध्वस्त झालेल्या शिक्षणव्यवस्थेचं हे आणखी एक दुर्दैवी उदाहरण आहे. भाजपाच्या राजवटीत विद्यार्थ्यांना 'अभ्यास' नव्हे तर 'लढाई' करायला भाग पाडलं जातं. आता हे स्पष्ट झालंय की प्रत्येकवेळी शांततेत तमाशा पाहणारे मोदी, पेपर फुटीचे रॅकेट आणि शिक्षण माफियांसमोर पूर्णपणे हतबल झालेत. नरेंद्र मोदी यांचे अक्षम सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळं देशाचं भविष्य वाचवण्याची आपल्याला गरज आहे."
सरकार मुलांच्या भविष्याशी खेळतंय : या प्रकरणी एक्सवर पोस्ट करत राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार गट) राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले की, "त्यांच्या असमर्थतेमुळं सरकार मुलांच्या जीवाशी आणि भविष्याशी खेळतंय," असा आरोप त्यांनी केला. तसंच नीट आणि नेट या स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या वादात नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) महासंचालक सुबोध कुमार सिंह यांना हटवल्याबद्दल प्रतिक्रिया देताना क्रास्टो म्हणाले की, "सुबोध कुमार सिंह यांची हकालपट्टी करुन धर्मेंद्र प्रधान आपलं कर्तव्य पार पाडण्यात आलेल्या अपयशापासून स्वत:ला वेगळे करू शकत नाहीत. त्यांनी मंत्रीपद सोडले पाहिजं. त्यांनी देशातील परीक्षा प्रक्रियेतील सर्व गोंधळ आणि गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे."
‘एनटीए’ प्रमुखांची उचलबांगडी : देशभरात नीट-यूजी 2024 आणि यूजीसी-नेट या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अनियमितता झाल्याच्या आरोपांवरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘नॅशलन टेस्टिंग एजन्सी’चे (एनटीए) महासंचालक सुबोध कुमार सिंह यांची शनिवारी (22 जून) रात्री उचलबांगडी करण्यात आली. तसंच एनटीएच्या प्रमुखपदी पुढील नियुक्ती होईपर्यंत ‘भारत व्यापार प्रसार संघटने’चे (आयटीपीओ) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंह खारोला यांच्याकडं ‘एनटीए’ची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलीय.
हेही वाचा -
- नीट पेपर लीक प्रकरण: चौथी पास ट्रॅक्टर चालकाला अटक, जाणून घ्या त्याचा कसा आहे सहभाग ? - NEET Paper Leak Case
- 'नीट'नंतर आता सीईटी परीक्षेत मोठा गोंधळ, पेपरमध्ये ५४ चुका; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा - Aaditya Thackeray On CET Paper
- बिहारमध्ये नीटचा पेपर कसा फुटला? गेस्ट हाऊसमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच मिळाली होती उत्तरे - NEET UG Paper Leak 2024