लखनौ Mukhtar Ansari News : गेल्या 19 वर्षांपासून देशातील वेगवेगळ्या तुरुंगात बंद असलेला उत्तर प्रदेशचा माफिया मुख्तार अन्सारी याचा गुरुवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. बांदा कारागृहात रात्री उशिरा मुख्तारला हृदयविकाराचा झटका आल्यानं वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तिथं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीही मुख्तार याची प्रकृती खालावल्यानं त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं.
कोण आहे मुख्तार अन्सारी? : मुख्तार अन्सारीचा जन्म 3 जून 1963 रोजी पूर्व उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद इथं सुभानुल्लाह अन्सारी आणि बेगम राबिया यांच्या पोटी झाला. या कुटुंबाची प्रतिष्ठित राजकारणी अशी ओळख होती. मुख्तारचे आजोबा मुख्तार अहमद अन्सारी हे स्वातंत्र्यसैनिक होते. महात्मा गांधींसोबत काम करताना ते 1926-27 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षही होते. दिल्लीतील एका रस्त्यालाही मुख्तारच्या आजोबांचं नाव देण्यात आलंय. याशिवाय मुख्तारची आईदेखाली देशातील एका प्रसिद्ध कुटुंबाशी संबंधित आहे. इतकंच नाही तर देशाचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हेही मुख्तारचे मामा असल्याचं समजतं. मुख्तार अन्सारीचे सिबगतुल्ला अन्सारी आणि अफजल अन्सारी हे दोन्ही भाऊ राजकारणात सक्रिय आहेत.
मुख्तारचे आजोबा नवशेरा युद्धाचे नायक : मुख्तार अन्सारी हा उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया होता. त्यानं बंदूक हाती घेत उत्तर प्रदेशातील वातावरण बिघडवलं. कधी कुणाला मारणं तर कधी दंगल घडवणं हा मुख्तारचा जणू छंद बनला होता. पण, त्याच्या आजोबांनी कधीकाळी देशाच्या रक्षणासाठी बंदूक हाती घेतली होती. महावीर चक्र विजेते ब्रिगेडियर उस्मान मुख्तार अन्सारी याचे आजोबा 1947 च्या युद्धात भारतीय सैन्याच्या वतीनं लढलं. नवशेराच्या युद्धात त्यांनी भारताला विजय मिळवून दिला. मात्र, शत्रूची गोळी छातीवर घेत ते भारतासाठी हुतात्मा झाले.
कम्युनिस्ट पक्षाकडून पहिल्यांदा लढवली निवडणूक : मुख्तारचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक असताना, मुख्तारचे वडील सुभानुल्लाह अन्सारी यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकलं. कम्युनिस्ट नेते असलेले सुभानुल्लाह हे त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळं ते 1971 च्या महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आले. मुख्तार यांना त्यांचा भाऊ अफजल अन्सारीप्रमाणे राजकारणात येण्याची इच्छा होती. त्यामुळं मुख्तारनं भारतीय कम्युनिस्ट पक्षातून राजकारणात प्रवेश केला. 1995 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत मुख्तारनं तुरुंगात असताना कम्युनिस्ट पक्षाकडून गाझीपूर सदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. परंतु, त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. मुख्तार अन्सारी 1996 मध्ये बसपाच्या तिकिटावर विजयी होऊन पहिल्यांदा विधानसभेत पोहोचला. त्यानंतर 2002, 2007, 2012 आणि पुन्हा 2017 मध्ये मऊ इथून विधानसभेची निवडणूक विजयी झाला. तुरुंगात असताना मुख्तारनं 2007, 2012 आणि 2017 च्या निवडणुका जिंकल्या होत्या. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्तार यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. त्यानं आपल्या राजकारणाचा वारसा मुलगा अब्बास अन्सारीकडं सोपवला.
योगी सरकारनं मुख्तारचं 'गुन्हेगारी विश्व' केलं उद्धवस्त : 2005 पासून तुरुंगात असलेल्या कुख्यात माफिया मुख्तार अन्सारीविरुद्ध उत्तर प्रदेशात एकूण 63 तर दिल्ली आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 1 खटला दाखल आहे. यातील 21 प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. तर आतापर्यंत 8 प्रकरणांमध्ये माफिया अन्सारीला शिक्षा झालीय. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्या टोळीतील 282 माफियावरकारवाई केलीय. त्यांच्यावर एकूण 143 गुन्हेही दाखल झाले आहेत. योगी सरकारच्या कारवाईमुळं भीतीपोटी त्याच्या 15 सहकाऱ्यांनी आत्मसमर्पण केलं. त्याच्या 167 शस्त्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. योगी सरकारच्या कार्यकाळात बांदा तुरुंगात बंदिस्त असलेल्या मुख्तार अन्सारीच्या 6 गुंडांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार (NSA) गुन्हा नोंद करण्यात आला. मुख्तार आणि त्याच्या कुटुंबीयांची सुमारे 5 अब्ज 72 कोटी रुपयांची संपत्ती योगी सरकारनं जप्त केली. काही मालमत्ता योगी सरकारनं उद्धवस्त केलीय.
संपूर्ण कुटुंबावर गुन्हे दाखल : माफिया मुख्तार अन्सारी आणि भाऊ अफजल अन्सारीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांवर एकूण 97 गुन्हे दाखल आहेत. अफजल अन्सारीविरुद्ध 7, सिबगतुल्ला अन्सारीविरुद्ध 3, मुख्तारची पत्नी अफशान अन्सारीविरुद्ध 11, मुख्तारचा मुलगा अब्बास अन्सारीविरुद्ध 8, उमर अन्सारीविरुद्ध 6 आणि अब्बासची पत्नी निखत बानोविरुद्ध 11 गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा :