मुंबई - Dandi March Day : उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया... महात्मा गांधी यांचं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतलं स्थान अधोरेखित करण्याचं काम या ओळी अगदी सहजपणे करतात. आपल्या भारतात इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात गांधीजींनी शांती आणि अहिंसेच्या मार्गाने असहकार पुकारला. मिठावर कर वसूल करणाऱ्या इंग्रज सरकारला हादरवून टाकणारं पाऊल उचललं. स्वातंत्र्यलढ्यातल्या अनेक आंदोलनांनी ब्रिटीश सरकारची भारताच्या मातीत घट्ट रुजत चाललेली मूळं खिळखिळी करण्याचं काम केलं. 'दांडी यात्रा' अर्थात 'मिठाचा सत्याग्रहाचं' स्थान या आंदोलनांमध्ये अगदी वरच्या क्रमांकावर आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांना एका सामायिक उद्दिष्टासाठी एकत्र आणून महात्मा गांधींनी ब्रिटिश सत्तेला नवं आव्हान दिलं. गांधीजींना प्रत्येक काम अत्यंत शांततेनं आणि साधेपणानं करायला त्यांना आवडत असे. तलवार किंवा बंदूक नाही, तर सत्य आणि अहिंसा हीच महत्त्वाची शस्त्रं आहेत, हा विचार त्यांनी भारतीयांना दिला. 12 मार्चपासून सुरू झालेल्या या 'दांडी यात्रे'त गांधीजींनी हीच शस्त्रं वापरली आणि ब्रिटीश सैनिकांना घाम फुटला.
महात्मा गांधी यांचा 'दांडी मार्च' : स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सरकारनं विविध कायदे आणि आदेशांद्वारे भारतीयांचं शोषण केलं होतं. जनतेवर विविध प्रकारे अत्याचार करण्यात आले. हवा आणि पाण्यानंतर, मीठ ही नेहमीच सर्वात महत्त्वाची गरज असते. इंग्रजांनी देशातील समुद्र किनाऱ्यावर मिळणाऱ्या मिठाच्या प्रक्रियेवर आणि व्यापारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली होती. भारतात अनेक ठिकाणी समुद्रकिनारी मीठ आधीच मोफत उपलब्ध होतं. तरीही ब्रिटीश सरकारनं मिठावर आपली मक्तेदारी दाखवून लोकांना जबरदस्तीनं ते विकत घेण्यास भाग पाडलं. मिठावर कर लादला गेला. याबाबत देशभरात संताप व्यक्त झाला. याच्या निषेधार्थ महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. 8 मार्च रोजी अहमदाबाद येथे एका विशाल सभेला गांधीजींनी संबोधित केलं. त्यांनी या सभेत मीठ कायदा मोडण्याचा निर्णय जाहीर केला. सभेला संबोधित करताना त्यांनी निग्रह बोलून दाखवला की, ''मी दांडीत मिठाचा कायदा मोडणार.''
इंग्रजांचा दडपशाही कायदा : 'दांडी मार्च'ला इतिहासात 'मिठाचा सत्याग्रह' आणि 'दांडी सत्याग्रह' म्हणूनही ओळखलं जातं. 1930 मध्ये ब्रिटीश सरकारनं मिठावर कर लावला होता, तेव्हा महात्मा गांधींनी या कायद्याविरोधात आंदोलन सुरू केलं. या ऐतिहासिक सत्याग्रहात गांधींसह 78 जण अहमदाबाद साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत पायी (290 किलोमीटर) चालले. हा प्रवास 12 मार्च रोजी सुरू झाला आणि 5 एप्रिल 1930 रोजी त्यांनी हातात मीठ घेऊन कायदा मोडण्याचं आवाहन केलं. 'दांडी मार्च' 24 दिवसांचा होता. या आंदोलनानं शेवटी इंग्रजांना दडपशाहीचा मीठ कायदा मागे घेण्यास भाग पाडलं. दांडी यात्रेची लोकप्रियता ब्रिटिशांना हादरून गेली. ब्रिटीश हे आंदोलन दडपण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करू लागले होते. 31 मार्च 1930 पर्यंत देशात सुमारे 95,000 लोकांना अटक करण्यात आली होती. खरंतर हा इंग्रज साम्राज्याला धोक्याचा इशारा होता. दांडी मार्च नंतर सतरा वर्षांनी आपण भारतीयांनी इंग्रजांची जुलमी राजवट उखडून टाकली आणि 15 ऑगस्ट, 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं.
हेही वाचा :