त्रिवेंद्रम Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी हे केरळमधील वायनाड इथून बुधवारी आपला लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वायनाड मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (सीपीआय) उमेदवार ॲनी राजा यांच्यात जोरदार लढत होणार आहे.
इंडिया आघाडीतील घटक पक्षातच जोरदार लढत : काँग्रेस नेते राहुल गांधी हे वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर ॲनी राजा या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाकडून उमेदवारी दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष 'इंडिया' आघाडीचे घटक पक्ष आहेत. मात्र तरीही वायनाड लोकसभा मतदार संघातून राहुल गांधी यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानं आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षात सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
कोण आहेत ॲनी राजा : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया वायनाडमधून राहुल गांधी यांच्याविरोधात उमेदवार उभा करत आहे. त्यामुळे वायनाड लोकसभा मतदार संघावर देशभराचं लक्ष लागलं आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या ॲनी राजा या डी राजा यांच्या पत्नी आहेत. ॲनी राजा यांनी या अगोदर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं राष्ट्रीय महिला सरचिटणीस पद भूषवलं आहे. त्या सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आहेत. केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील इरिट्टी इथं ॲनी राजा यांचा जन्म झाला आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सीपीआयची विद्यार्थी संघटना असलेल्या ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन आणि ऑल इंडिया युथ फेडरेशनमध्ये काम करुन केली.
भाजपानं प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांना दिली उमेदवारी : वायनाड लोकसभा मतदार संघातून काँग्रेस नेते राहुल गांधी हे बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी कलपेट्टा शहरात रॅली काढून आपल्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपानं प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वायनाड मतदार संघातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात ॲनी राजा आणि के सुरेंद्रन यांचं तगडं आव्हान असणार आहे.
हेही वाचा :