नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज दुपारी तीन वाजता घोषणा होणार आहे. त्याबाबत भारतीय निवडणूक आयोग (Election commission of India) पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी काही राज्यांच्या निवडणूक वेळापत्रकाचीदेखील घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचे सोशल मीडियातून लाईव्ह प्रसारण होणार आहे. निवडणूक निकालाच्या तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे. लोकसभा निवडणुका ७ टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे.
नुकतेच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील समितीनं जम्मू काश्मीरला भेट देऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली. दोन्ही सनदी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक आयुक्तांचं यावेळी स्वागत केलं. दरम्यान, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी योग्य प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचा आरोप यापूर्वी काँग्रेसनं केला आहे.
- सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. त्यापूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणं आवश्यक आहे. मागील लोकसभा निवडणुकीची घोषणा 10 मार्च रोजी झाली होती. तर 11 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान झालं होतं. 23 मे रोजी मतमोजणी पूर्ण झाली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे एसबीआयवर ताशेरे - दुसरीकडं निवडणूक रोख्यांची माहिती सादर करण्यावरून सर्वोच्च न्यायालयानं एसबीआयवर ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एसबीआयनं निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांची माहिती दिलीय. निवडणूक रोख्यांमध्ये भाजपाला सर्वाधिक राजकीय देणग्या मिळाल्याचं दिसून आलं. सुप्रीम कोर्टानं निवडणूक रोख्यांबाबत माहिती देण्यासाठी एसबीआयनं मुदत वाढवून देण्याची मागणी फेटाळून लावली होती.
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा - काँग्रेसनं लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसनं पहिली यादी 8 मार्चला जाहीर केली. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केलेल्या यादीत 39 उमेदवारांची नावं देण्यात आली आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत एकूण 43 नावं आहेत. असं असलं तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही.
महायुतीमधील जागावाटपाबाबत अंतिम निर्णय नाही - भारतीय जनता पक्षानं लोकसभेच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या यादीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं आहेत. यामध्ये भाजपा नेते पंकजा मुंडे व सुधीर मुनंगटीवार यांचादेखील समावेश आहे. दुसरीकडं महायुतीमधील जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
हेही वाचा-