छतरपूर : मध्य प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) ज्येष्ठ नेते महेंद्र गुप्ता यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बिजावरमधून पक्षाकडून तिकीटही मिळालं होतं. महेंद्र गुप्ता हे छतरपूर येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच छतरपूरचे एसपी अमित सांघी घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला.
कोण होते महेंद्र गुप्ता : महेंद्र गुप्ता यांची बसपाच्या वजनदार नेत्यांमध्ये गणना केली जात होती. 2023 च्या निवडणुकीत मायावतींनी त्यांना बिजावर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. यापूर्वी ते ईशानगरचं सरपंचही होते. ते गेल्या काही वर्षांपासून बसपासाठी सक्रियपणे काम करत होते. यामुळंच ते जिल्ह्यातील पक्षातील सर्वात वजनदार नेत्यांपैकी एक होते. 2019 च्या निवडणुकीतही बसपानं त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत. अनेक लोकांशी महेंद्र गुप्ता यांचे वाद होते. त्यांच्यासुरक्षेसाठी सरकारी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले होते.
डोक्यात गोळी झाडल्यानं मृत्यू : एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी महेंद्र गुप्ता ईशानगरहून छतरपूरला आले होते. गुप्ता यांच्यावर हल्ला करण्यासाठी आरोपी अगोदरच दबा धरून बसले होते, असं पोलिसांनी सांगितलंय. लग्नातून बाहेर येताच आरोपींनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. छतरपूर पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी नाकाबंदी सुरू केली आहे. छतरपूरचे एसपी स्वत: घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू केली.
हे वाचलंत का :