कोल्हापूर : बेळगावात आजपासून कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मराठी भाषिकांवर अन्याय करण्यासाठीच कर्नाटक सरकार जाणून-बुजून बेळगावात अधिवेशन घेत आहे, असा आरोप मराठी एकीकरण समितीच्या वतीनं करण्यात येत आहे. याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावमधील छत्रपती संभाजी महाराज चौकात महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. मात्र कर्नाटक पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी नाकारली. कोल्हापुरातून बेळगावकडं येणाऱ्या वाहनांची कागल जवळील दुधगंगा नदीपुलावर कसून तपासणी सुरू असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कर्नाटक पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या 30 सदस्यांना नजरकैदेत ठेवलं आहे.
एकीकरण समितीच्या 30 सदस्यांना ठेवलं नजर कैदेत : महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावातील छत्रपती संभाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या महामेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. तर एकीकरण समितीचे सदस्य माजी आमदार मनोहर किणेकर, नेताजी जाधव, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगळे यांच्यासह समितीच्या सदस्यांना कर्नाटक पोलिसांनी नजर कैदेत ठेवलं आहे. "मराठी भाषिकांच्या या मेळाव्याला विरोध करण्यासाठीच कर्नाटक सरकार मुद्दामहून प्रयत्न करत आहे," असं माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले.
56 वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : गेल्या 56 वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. केंद्रातील अनेक सरकार बदलली, मात्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर कोणताच निर्णय झालेला नाही. दरवर्षी 1 नोव्हेंबर हा कर्नाटक सरकारचा स्थापना दिवस बेळगावसह सीमा भागात काळा दिन म्हणून पाळला जातो. तर बेळगाव शहराला कर्नाटक सरकारनं उपराजधानीचा दर्जा देऊन याच ठिकाणी हिवाळी अधिवेशन पार पडते. यामुळे कर्नाटक शासनाकडून मराठी भाषिकांवर जाणून-बुजून अन्याय केला जात असल्याची भावना गेली अनेक वर्ष बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिकांचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीची आहे. आजपासून बेळगाव इथं सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला मराठी भाषिकांचा विरोध आहे. यामुळेच बेळगावात मराठी भाषेचा हुंकार बुलंद करण्यासाठी मराठी भाषिक आज एकवटणार आहेत. तत्पूर्वी कर्नाटक पोलिसांनी बेळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात कलम 144 लागू केल्यामुळे या महामेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक महामार्गावरून कर्नाटकात प्रवेश करू नयेत, यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदी पुलावर महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांचा प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे या भागाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे.
कोल्हापुरातून निघणार भगवी रॅली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील ताराराणी चौकातून बेळगावच्या दिशेनं शिवसैनिकांसह भगवी रॅली रवाना होणार आहे. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी या रॅलीच्या माध्यमातून हजारो शिवसैनिक आणि सीमाभागातील मराठी भाषिक बेळगावकडं जाणार आहेत. मात्र कर्नाटक पोलिसांकडून दूधगंगा नदी पुलावर नाकाबंदी करण्यात आली. प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच बेळगावकडं वाहनं सोडली जात आहेत. यामुळे शिवसेनेची भगवी रॅली बेळगावात पोहोचण्याआधीच कर्नाटक पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांचा राष्ट्रीय महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यामुळे सीमा भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा :
- महाराष्ट्र दिन: बेळगावसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात समाविष्ट करा, ठाकरे गटाच्या 'या' नेत्यांची मागणी - Maharashtra Foundation Day 2024
- भाजपानं खेळलं भाषेच्या अस्मितेच कार्ड, बेळगावच्या महानगरपालिकेला 5 वर्षानंतर मिळाले कन्नड भाषिक महापौर
- Maharashtra Karnataka Border Dispute : बेळगाव विभाजनाचा कर्नाटकचा डाव; सीमावाद चिघळण्याची शक्यता