नवी दिल्ली- उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य यांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली. 2023 चा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटातील अजरामर गाण्यांचं गीतलेखन करणारे गुलजार हे लोकप्रिय उर्दू कवी आहेत. 1963 च्या बंदिनी चित्रपटातून गीतकार म्हणून बॉलीवूडमधील कारकीर्दीली सुरुवात केली. संगीत दिग्दर्शक एसडी बर्मन यांच्यासोबत त्यांची चांगली भट्टी जमली. जुन्या संगीतकाराबरोबर त्यांनी सलील चौधरी, विशाल भारद्वाज आणि एआर रहमान यांसारख्या संगीतकारांबरोबर काम केले. त्यांची प्रतिभा केवळ गीतलेखनापुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी आंधी, मौसम आणि टीव्ही मालिका मिर्झा गालिब यासारख्या उल्लेखनीय चित्रपटांच दिग्दर्शन केलं.
एका पुस्तकानं बदललं आयुष्य- झेलम जिल्ह्यातील दिना गावात माखन सिंग कालरा आणि सुजन कौर यांच्या पोटी गुलजार यांचा जन्म झाला. गुलजार हे माखन सिंग यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा होता. त्याच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या आईचं निधन झाले. त्यानंतर माखन सिंग यांच्या तिसऱ्या पत्नीनं गुलजार यांचं पालनपोषण केलं. गुलजार हे बालपणी रोज पुस्तकांच्या स्टॉलवरून नवीन पुस्तक घ्यायचे. एके दिवशी कंटाळून स्टॉल मालकानं त्यांना रवींद्रनाथ टागोरांच्या पुस्तकाचा उर्दू अनुवाद दिला. या पुस्तकानं गुलजार यांचं संपूर्ण आयुष्य बदललं. रविंद्रनाथ टागोर यांचे साहित्य वाचून त्यांनी लेखक होण्याचा निश्चय केला. त्यानंतर त्यांनी पुस्तके वाचण्याबरोबरच लेखनाला सुरुवात केली.
आर्थिक परिस्थितीमुळे धरावी लागली मुंबईची वाट- गुलजार यांना भारत-पाकिस्तानच्या फाळणीचा आर्थिक फटका बसला. त्यांना कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहात शिक्षण अर्धवट सोडावं लागले. मुंबईतील भायखळा येथं त्यांनी गॅरेजमध्ये काम केलं. वाहनं रंगवण्याबरोबरच जीवनात रंग भरणारे पुस्तक त्यांनी वाचण्याची सवय कधीच सोडली नाही. कामातून वेळ मिळताच मनात आलेल्या कविता आणि विचार कागदावरून लिहायचे. गुलजार यांनी लेखनात करियर करणार असल्याचं वडील संतापले. लेखक म्हणून जगायचे असेल तर भविष्य पूर्णपणं उद्धवस्त होईल, असं सुनावलं. मात्र, कितीही खराब दिवस आले तरी लेखकच होणार, अशी गुलजार यांची जिद्द होती.
चित्रपट दिग्दर्शन सोडले! गीतलेखनानंतर गुलजार यांनी चित्रपट दिग्दर्शनात प्रवेश केला. 1971 मध्ये 'मेरे अपने' हा त्यांचा दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट होता. त्यांनी एकूण 17 चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. आनंद सिनेमाचेही त्यांनी संवाद लेखन केलं. "मोरा गोरा रंग ले ले ते चड्डी के फूल खिला है, अशा वैविध्यपूर्ण गाण्यातून त्यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेचं दर्शन घडविलं. गुलजार यांना 'कोशिश' (1972), 'मौसम' (1975), 'इजाज' (1987), 'लेकिन' (1991) आणि माचीस (1996) या 5 चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'हू तू तू' (1999) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आदळला. या चित्रपटाच्या अपयशानंतर गुलजार हे कमालीचे नैराश्यावस्थेत गेले. या काळात त्यांची कन्या मेघना यांनी पित्याला सावरलं. तेव्हापासून त्यांनी चित्रपट दिग्दर्शन पूर्णपणं बंद केलं. गुलजार यांची कन्या मेघना या आता यशस्वी दिग्दर्शिका म्हणून ओळखल्या जातात.
रामभद्राचार्य यांनादेखील ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर- मध्य प्रदेशातील चित्रकूट येथील तुलसीपीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य यांनादेखील ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी हिंदू अध्यात्म, शिक्षण आणि साहित्यिक कार्यांत उल्लेखनीय कार्य केलं. विशेष म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत कोणतेही औपचारिक शिक्षण न घेताही ते सुमारे २२ भाषांमध्ये प्रवीण आहेत. त्यांनी ब्रेलच्या मदतीशिवाय संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली आणि इतर अनेक भाषांमध्ये उत्स्फूर्त कवी आणि लेखक म्हणून प्रतिभेचं अलौकिक दर्शन घडविलं आहे. यापूर्वी 2022 चा ज्ञानपीठ पुरस्कार गोव्यातील लेखक दामोदर मौझो यांना प्रदान करण्यात आला.
हेही वाचा-या उद्योगपतीच्या बायोपिकसाठी गुलजार-रहमान पुन्हा येणार एकत्र