कोटा JEE Advanced 2024 Paper Analysis : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs) मध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई ॲडव्हान्स प्रवेश परीक्षा रविवारी (26 मे) दोन सत्रांत पार पडली. आयआयटी मद्रासनं घेतलेल्या या परीक्षेत 1.91 लाख उमेदवारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 95 टक्क्यांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली.
जीईई परीक्षेच्या पेपर 1 आणि पेपर 2 चे विश्लेषण करताना, खासगी कोचिंगचे संस्थापक आणि सीईओ नितीन विजय म्हणाले की, "जेईई ॲडव्हान्स 2024 पेपरची पातळी मागील वर्षी सारखीच होती. पेपरची काठीण्य पातळी मध्यम ते अवघड अशी झाली आहे. सगळे प्रश्न सोडवण्यासारखे होते. दोन्ही सत्रांमध्ये गणिताचा पेपर अवघड, भौतिकशास्त्राचा पेपर मध्यम तर रसायनशास्त्राचा पेपर सोपा होता."
गणित : पेपर 1 आणि 2 साठी स्टॅटिस्टिक्स, डेफिनिट इंटिग्रल फंक्शनमधून प्रश्न आले. त्यात क्रमपरिवर्तन आणि संयोजन, 3-डी भूमिती आणि सर्कल यांच्यातील काही चांगले प्रश्न समाविष्ट होते. तर काही प्रश्न कठीण स्वरुपाचे होते. यामध्ये फंक्शन, लिमिट, डेफिनिट इंटिग्रेशन, मॅट्रिक्स, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स, पी अँड सी, कॉम्प्लेक्स नंबर्स आणि थ्रीडी भूमिती या विषयांवरून प्रश्न विचारण्यात आले.
रसायनशास्त्र : ऑरगॅनिक केमिस्ट्रीमधून बरेच प्रश्न आले. याशिवाय इनऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये एनसीईआरटीचे थेट प्रश्न होते. भौतिक रसायनशास्त्रात थर्मोडायनामिक्स, केमिकल इक्विलिब्रियम, केमिकल कायनेटिक्स आणि अणु संरचन या विषयांवर प्रश्न आले. सेंद्रिय रसायनशास्त्रातील मिश्र संकल्पनांवर उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. बहुतेक प्रश्न अमाईन, पॉलिमर, बायोमोलेक्यूल्स संदर्भात विचारण्यात आले. भौतिक रसायनशास्त्राच्या सर्व अध्यायांमधून प्रश्न विचारण्यात आले होते.
भौतिकशास्त्र : या पेपरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स, किनेमॅटिक्स, आधुनिक भौतिकशास्त्र आणि ऑप्टिक्सवर या विषयांवर भर देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. भौतिकशास्त्रात इलेक्ट्रिक करंट, मेकॅनिक्स आणि थर्मोडायनामिक्सच्या चुंबकीय प्रभावाशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले होते.
9 जून रोजी लागणार निकाल : जेईई ॲडव्हान्स प्रवेश परीक्षेचा प्रतिसाद 31 मे रोजी परीक्षेनंतर प्रसिद्ध केला जाईल. तर प्रोविजनल उत्तरं 2 जून रोजी ऑनलाइन उपलब्ध केली जाणार असून त्यानंतर हरकती घेतल्या जातील. अंतिम उत्तर की आणि निकाल 9 जून रोजी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर घोषित केले जातील.
मुलींना जागा मिळण्याची अधिक शक्यता : देशभरातील 23 आयआटीमध्ये 17 हजार 385 जागा आहेत. यासाठी 1 लाख 91 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत. अशा प्रकारे प्रत्येक जागेसाठी सुमारे 11 उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे. 20 टक्के जागा महिला-अल्पसंख्याक कोट्यातील आहेत. साधारणपणे, JEE Advanced परीक्षेत मुला-मुलींचं प्रमाण 65 आणि 35 टक्के असते. अशा परिस्थितीत मुलांच्या तुलनेत मुलींना आयआयटीमध्ये जागा मिळण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळं यंदाही मुलींना जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -