शाजापूर / मध्य प्रदेश : Bharat Jodo Nyaya Yatra : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या मध्य प्रदेशात आहे. येथील शाजापूरला यात्रा दाखल होताच येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर "जय श्रीराम"च्या घोषणा दिल्या. त्यावेळी राहुल गांधी गाडीतून खाली उतरत त्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी रस्ता ओलांडून गेले. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना बटाटे भेट दिले. तसंच, जोरजोरात "जय श्रीराम" अशा घोषणा दिल्या. त्यानंतर राहुल गांधी यांनी 'मोबाईल घ्या आणि तुम्ही असाचं जय श्री रामाचा जप करत राहा आणि उपाशी राहा' असा टोला या तरुणांना लगावला.
तरुणाईचा राम जप : राहुल गांधी यांनी यावेळी मागासवर्गीयांचा मुद्दाही उपस्थित केला. तसंच, केंद्र आणि राज्य सरकारवर एकामागून एक शाब्दिक हल्ले केले. श्रीरामाचं नाव घेत राहुल गांधी म्हणाले की, 'मोदीजींची इच्छा आहे की, आजच्या तरुणांनी दिवसभर मोबाईल फोनमध्ये व्यग्र राहावं, जय श्रीराम म्हणावं आणि उपाशी मरावं.' यासोबतच त्यांनी जातीवादावरही वक्तव्य केलं असून, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मवादाला खतपाणी घालत आहेत. तसंच, जातीवादावरून लोकांना आपापसात भांडायला लावत आहेत' असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
राहुल यांच्या ताफ्यासमोर मोदी-मोदीच्या घोषणा : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नियोजित मार्गानुसार शाजापूर येथे पोहोचून माझनिया जोड धोबी चौक, टाकी चौक मार्गे पुढे गेली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्यासमोर मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. हे ऐकताच राहुल गांधी कारमधून खाली उतरले आणि भाजप कार्यकर्त्यांना भेटायला गेले. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना बटाटे भेट दिले. त्यातून सोनं काढण्यास सांगितलं.
50 किलोमीटरच्या या प्रवासात हजारो फ्लेक्स : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेबाबत काँग्रेसजनांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. शाजापूर राजगढच्या सीमावर्ती शहर सारंगपूरपासून ते मकसीपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी होर्डिंग्ज आणि फ्लेक्स लावले होते. सुमारे 50 किलोमीटरच्या या प्रवासात हजारो फ्लेक्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले होते. मात्र, या फ्लेक्समध्ये काँग्रेसमधील गटबाजी दिसून आली. फ्लेक्समध्ये दिग्विजय सिंह गट, कमलनाथ गट आणि जितू पटवारी गटाचे फ्लेक्स स्पष्टपणे दिसत होते.
हेही वाचा :
1 स्टॅलिननंतर ए. राजा यांचं भारतासह रामाबद्दल खळबळजनक वक्तव्य, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया
2 डी के शिवकुमार यांना मोठा दिलासा, मनी लाँड्रिंगचा गुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
3 तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी रामोजी ग्रुपचे चेअरमन रामोजी राव यांची घेतली भेट