नवी दिल्ली Iran Israel Conflict : इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणावात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, आमचा हल्ला संपला असून आम्हाला तो सुरू ठेवायचा नाही, असं इराणचं म्हणणं आहे. इराणनं 1 एप्रिल रोजी दमास्कसमधील आपल्या वाणिज्य दूतावासावर इस्रायलनं केलेल्या संशयित हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. आता इस्रायल देखील या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची योजना आखत आहे.
संयम बाळगण्याचा भारताचा सल्ला : इराणच्या या हल्ल्याचा अमेरिकेने निषेध केला असून, भारतानं दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळं हवाई सेवेवर परिणाम होण्याती शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातून इस्रायलला जाणाऱ्या विमानांची सेवा स्थगित होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीय.
इराणी हवाई क्षेत्र टाळण्याची घोषणा : एअर इंडिया तसंच विस्तारा विमान कंपनीनं इराणी हवाई क्षेत्र टाळण्याची घोषणा केली आहे. प्रवासांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्यांच्या विमान कंपन्या लांब पल्ल्याच्या मार्गांचा अवलंब करत आहेत. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळं भारतीय विमान कंपन्या युरोप आणि मध्य पूर्वेकडे जाणारे उड्डाण मार्ग बदलत आहेत.
इस्रायलवर केलेल्या हवाई हल्ल्याचा निषेध : अमेरिका, कॅनडा, संयुक्त राष्ट्र, जर्मनी आदी देशांनी इराणनं इस्रायलवर केलेल्या हवाई हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी G-7 देशांच्या नेत्यांची बैठक बोलावली. इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाबाबत भारतानं रविवारी चिंता व्यक्त केलीय. तसंच दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केलंय. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळं आम्ही गंभीरपणे चिंतित आहोत. ज्यामुळं या भागातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. आम्ही दोन्ही देशांना तत्काळ तणाव कमी करण्याचे, संयम बाळगण्याचे तसंच हिंसाचारापासून मागे हटण्याचे आवाहन करतो, असंही भारतानं म्हटलं आहे.
हे वाचलंत का :
- मध्य पूर्वेत युद्धाचं ढग, हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागली डझनभर क्षेपणास्त्रे - israel iran news
- मध्यपूर्वेत धोक्याची घंटा, इराणनं जप्त केलं इस्रायलचं जहाज; भारताकडून ॲडव्हायझरी जारी - Iran seizes Israeli ship
- पाकिस्तान अमेरिका संबंध सुधारणार; राष्ट्राध्यक्ष जो बायडननं लिहिलं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र - US Pak Ties