नवी दिल्ली Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी सामान्य नागरिकांना डोळ्यापुढं ठेऊन योजना जाहीर केल्या आहेत. मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील 'चार जातीं'वर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचं यावेळी सांगितलं. त्यांनी चार जातींची नावं घेतली. यात गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण या त्या चार 'जाती' असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
चार जातींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील नागरिक आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्यात निर्मला सीतारामन यांनी देशातील चार जातींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. यात गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जाती असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितलं, "आमचं सरकार सर्वांगीण, आणि सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन घेऊन काम करत आहे. यात सर्व जाती आणि सगळ्या विभागातील नागरिकांचा समावेश आहे."
सामाजिक न्याय ही सरकारची मुख्य भूमिका : "देशातील महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी यांचा सर्वांगीन विकास हाच सरकारचा उद्देश आहे. केंद्र सरकार गरीबांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देते. महिला, गरीब, तरुण आणि शेतकरी यांचं जीवन चांगलं बनवण्यासाठी सरकारी मदतीची गरज असते. ती मदत त्यांना मिळते. या सगळ्यांचं कल्याणच देशाला पुढं नेईल," असं निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितलं. "देशातील इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करते. त्यामुळं सामाजिक न्याय हीच सरकारची मुख्य भूमिका आहे," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सरकार पुन्हा एकदा जनादेश मिळवेल : "सामाजिक न्याय हे प्रभावी प्रशासनाचं मॉडेल आहे. सामाजिक न्यायामुळंच आमच्या कृतीत धर्मनिरपेक्षता आहे. त्यामुळंच भ्रष्टाचार कमी करुन घराणेशाही रोखता येते. पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ योग्यरित्या पोहोचवता येतो," असंही त्यांनी यावेळी सांगितलं. "आमचं सरकार गोर गरीब नागरिकांसाठी चांगलं काम करत आहे. त्यामुळं नागरिकांकडून पुन्हा आम्हाला जनादेशाचा आशीर्वाद मिळेल," असा आशावादही निर्मला सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा :