बौद्धगया Indian Map Tampered : तैवानमधील बुद्धिस्ट असोसिएशननं बौद्धगयेत आयोजित कार्यक्रमात भारताच्या नकाशात छेडछाड केल्याचं उघडकीस आलं आहे. बुद्धिस्ट असोसिएशननं सुजातागडमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या नकाशात लडाख हा चीनचा तर जम्मू काश्मीर हा पाकिस्तानचा भाग दाखवण्यात आला. त्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे.
भारतीय नकाशासोबत छेडछाड झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल. भारतीय नकाशासोबत छेडछाड करणं चुकीचं आहे. या प्रकरणी चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल. - डॉ. एस एम त्यागराजन, जिल्हाधिकारी, गया
लडाख चीनचा तर जम्मू काश्मीर पाकिस्तानचा दाखवला भाग : या कार्यक्रमात भारताचा नकाशा लावण्यात आला होता. या नकाशात लडाखला चीनचा भाग दाखवण्यात आलं आहे. तर जम्मू काश्मीरला पाकिस्तानचा भाग दाखवण्यात आलं आहे. हा प्रकार पुढं आल्यानं प्रशासनात मोठी खळबळ उडाली. जिल्हा प्रशासनानं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अशी उघडकीस आली घटना : तैवानमधील बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीनं गरीबांना घरं बांधून देण्यात आली आहेत. रो हाऊसिंग डेव्हलपमेंट बुद्धिस्ट जुस्सी चॅरिटी फाउंडेशनतर्फे गरिबांना ही घरं देण्याचं काम केलं जात असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. या घरांच्या पायाभरणी कार्यक्रमाचं रविवारी आयोजन करण्यात आलं होतं. पायाभरणी कार्यक्रमात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये भारतीय नकाशाशी छेडछाड केल्याचं उघड झालं आहे. तैवान हा चीनचा भाग असल्याचा दावा चीन करत आहे. त्यामुळंच भारतीय नकाशावरुन वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज असल्याची मागणी करण्यात येत आहे.
सुजातागड बौद्धांचं प्रसिद्ध ठिकाण : भारतीय नकाशासोबत छेडछाड केल्याची घटना उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सुजातागड ही बौद्धांचं प्रसिद्ध ठिकाण आहे. सुजाता नावाच्या अनुयायी महिलेनं भगवान बुद्धांना खीर खाऊ घातल्यानंतर ते बौद्ध गयेला पोहोचले. त्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झाल्याची अख्यायिका आहे. त्यामुळं सुजातागड या ठिकाणाला महत्व आहे. मोठ्या संख्येनं इथं बौद्ध अनुयायी भेट देतात.
हेही वाचा :