लेह (लडाख) Indian Army Personnel Perform Yoga : भारतीय सैन्याच्या जवानांनी शुक्रवारी (21 जून) 10 व्या 'आंतरराष्ट्रीय योग दिना'निमित्त उत्तर सीमेवरील हिमशिखरांवर योगासनं केली. तसंच पूर्व लडाखमध्ये देखील सैन्य दलाच्या जवानांनी योगा केला. तर इंडो-तिबेट सीमा पोलीस कर्मचाऱ्यांनी सिक्कीमच्या मुगुथांग सब सेक्टरमध्ये 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर योगासनं केली.
इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी गेल्या अनेक वर्षांपासून सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह भारत-चीन सीमेवरील विविध हिमालयीन पर्वतरांगांवर योगासनं करून योगाचा प्रचार केलाय. आज देखील उत्तरेकडील लडाखपासून तर पूर्वेकडील सिक्कीमपर्यंत, इंडो-तिबेट सीमा पोलीस कर्मचाऱ्यांनी योगासनं केली.
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी अटारी, अमृतसर येथील जॉइंट चेक पोस्टवर झिरो लाइनवर बीएसएफ जवानांच्या योगाभ्यासाची सुंदर दृश्यं पोस्ट केली आहेत. यावेळी बीएसएफचे डीआयजी ब्रिगेडियर पवन बजाज (निवृत्त) उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास काय? : दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय योग दिना' 21 जून रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या 69 व्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. तेव्हा संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेनं हा प्रस्ताव मंजूर केला. पहिला 'आंतरराष्ट्रीय योग दिन' 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असून याला उन्हाळी संक्रांती देखील म्हणतात. त्यामुळं या दिवसाची निवड 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय योग दिनाची यंदाची थीम काय? : आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 ची थीम ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ अशी आहे. यामध्ये महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कशाप्रकारे संतुलित राखलं जाईल, याविषयीच्या माहितीवर भर दिला जाईल. 'आंतरराष्ट्रीय योग दिना'ची थीम नेहमी काहीतरी वेगळा संदेश देणारी असते. यंदा महिलांना केंद्रस्थानी ठेवून ही थीम ठेवण्यात आलीय.
हेही वाचा -