नवी दिल्ली First National Space Day 2024 : चांद्रयान-३ च्या यशाला आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यामुळं शुक्रवारी देशात पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा केला जात आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश बनला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.
भारताची 'अंत'राळ कामगिरी : देशाच्या अंतराळातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा केला जात आहे. महिना भरापासून केंद्र सरकार या कार्यक्रमाची तयारी करत आहे. हा दिवस भारताची ऐतिहासिक कामगिरी म्हणून चिन्हांकित करतो. या दिवशी भारत देश हा चंद्रावर रोव्हर उतरवणारा जगातील चौथा आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरणारा पहिला देश ठरला. चंद्र मोहिमेत मोठे यश मिळविल्यानंतर, भारत सरकारने अवकाश संशोधनातील भारताच्या वाढत्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अधिकृतपणे २३ ऑगस्ट हा राष्ट्रीय अतंराळ दिवस म्हणून घोषित केला.
भारताचा डंका जगात : इस्रोनं 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर विकम लँडरचं यशस्वी लँडिंग करून ऐतिहासिक कामगिरी केली. भारत हा जगातील पहिला देश बनला जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर उतरला. भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश बनला. प्रग्यान रोव्हरसह विक्रम लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागावर स्पर्श केला आणि भारताच्या अंतराळ संशोधनाच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण यश मिळवलं. या दिवशी देशभरात जल्लोषाचं वातावरण होतं. फटाके फोडून, पेढे वाटून भारतीय हा विजय साजरा करत होते.
राष्ट्रीय अंतराळ दिनाची थीम काय? : राष्ट्रीय अंतराळ दिनाची थीम “चंद्राला स्पर्श करताना जीवनांना स्पर्श करणे: भारताची अंतराळ गाथा” अशी आहे. ही थीम समाज आणि तंत्रज्ञानावर अवकाश संशोधनाच्या खोल प्रभावावर भर देते. अवकाश संशोधनाचा समाजावर झालेला सकारात्मक परिणाम अधोरेखित करणे हा या राष्ट्रीय अंतराळ दिनाचा भारताचा उद्देश आहे.