भोपाळ Bhopal Crime News : मध्य प्रदेशातील भोपाळमधून एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आलीय. येथे एका पतीनं संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पुरावे लपविण्यासाठी आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीनं आधी मृतदेह जाळला. त्यानंतर त्याचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पोलिसांनी महिलेची कवटी, पाय आणि इतर अवशेष जप्त केले आहेत.
21 मे रोजी ही वेदनादायक घटना घडलीय. आरोपी पती व्यवसायानं ऑटोचालक आहे. आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. परवाखेडा येथे राहणाऱ्या नदीम या ऑटो चालकाशी सानिया नावाच्या तरुणीचं 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासून नदीम सानियाच्या कुटुंबीयांकडून हुंडा म्हणून कारची मागणी करत होता. हुंडा न दिल्यानं तो तिचा छळ करत असायचा. इतकंच नाही तर नदीम सानियावर संशय घेऊन तिला मारहाणही करायचा.
मुलीचा अडीच महिन्यांपूर्वी मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, नदीम आणि सानिया यांना दोन महिन्यांची मुलगी होती. तिचा अडीच महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. उकळत्या पाण्यात पडल्यानं तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर सानिया आणि नदीमचं नातंही बिघडलं होतं. दोघांमध्ये रोज वाद व्हायचे, त्यामुळं सानिया वैतागली. ती बहिणीच्या घरी राहू लागली.
21 मे रोजी सानिया बेपत्ता : 22 वर्षीय सानिया 21 मे रोजी बेपत्ता झाली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, 21 मे रोजी नदीमनं सानियाला भेटण्यासाठी बोलावलं होतं. सानिया नदीमला भेटण्यासाठी तिच्या घरी आली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. सानियाच्या कुटुंबीयांनी निशातपुरा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. सानिया बेपत्ता झाल्यानंतर नदीमही बेपत्ता झाला होता. तपासादरम्यान पोलिसांना नदीमवर संशय आला. त्यानंतर त्याचा शोध सुरू घेण्यात आला.
आरोपीकडून गुन्ह्याची कबुली : पोलिसांनी नदीमला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानं सांगितलं की त्याला सानियाच्या चारित्र्यावर संशय होता. त्यानं आधी तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जाळला. यानंही त्याचं समाधान झालं नाही. तेव्हा त्यानं तिच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी आर्वालिया खंती येथून महिलेची कवटी, पाय आणि इतर अवशेष जप्त केलेत.