नवी दिल्ली Hathras Stampede : हाथरस सत्संग चेंगराचेंगरीत आतापर्यंत 123 भाविकांचा बळी गेला आहे. या चेंगराचेंगरी प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला. या चेंगरीचेंगरीतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याचा पोलीस शोध घेत होते, त्याला शुक्रवारी रात्री उशीरा दिल्लीतून अटक करण्यात आली. देव प्रकाश मधुकर याला दिल्लीतील उत्तम नगर परिसरातून अटक करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांनी देव प्रकाश मधुकर याच्यावर एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. देव प्रकाश मधुकर याच्या अटकेनंतर त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती यूपी पोलिसांनी दिली.
कोण आहे देव प्रकाश मधुकर : हाथरस सत्संग चेंगराचेंगरीत 123 भाविकांचा मृत्यू झाला, या प्रकरणी सूरजपाल उर्फ भोलेबाबाचा पोलीस शोध घेत आहेत. भोलेबाबाचा मुख्य सेवक म्हणून देव प्रकाश मधुकर हा काम करत होता. देव प्रकाश मधुकरनं उत्तर प्रदेश पोलीस आणि एसटीएफसमोर आत्मसमर्पण केलं, असा दावा भोलेबाबाचे वकील एपी सिंह यांनी केला आहे. देव प्रकाश मधुकर हा हृदयरोगानं ग्रस्त असून त्याच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा दावाही वकील एपी सिंह यांनी केला आहे.
#WATCH | Hathras stampede incident: Advocate AP Singh says, " dev prakash madhukar who was named in the fir in the hathras case, was said to be the main organiser has surrendered in front of sit, stf and police. it was my promise that we will not use any anticipatory bail, will… pic.twitter.com/wy8pgUSNJe
— ANI (@ANI) July 5, 2024
देव प्रकाश मधुकरचं हातरस पोलिसांसमोर आत्मसमर्पण : यूपी पोलीस देव प्रकाश मधुकर याचा शोध घेत होते. पोलिसांनी दिल्लीच्या नजफगढ उत्तम नगरातील रुग्णालयातून त्याला अटक केलं. मात्र देव प्रकाश मधुकरनं हातरस पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे, असा दावा करण्यात येत आहे. हातरस पोलीस आरोपीची चौकशी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. "देव प्रकाश मधुकर यांचा ईसीजी रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर वकील एपी सिंह यांनी यूपी पोलिसांना माहिती दिली होती," असा दावा त्यांच्या वतीनं करण्यात येत आहे. यूपी एसटीएफच्या पथकानं देव प्रकाश मधुकरला दिल्लीतून अटक केली. याआधी पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना अटक केलं आहे.
राहुल गांधींनी हाथरस पीडितांची घेतली भेट : मंगळवारी उत्तर प्रदेशातील हाथरस इथं भोलेबाबाचा सत्संग संपल्यानंतर अचानक चेंगराचेंगरी झाली. यात 123 भाविकांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरुन राजकारणही चांगलंच तापलं असून राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोप करत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हाथरस चेंगराचेंगरीतील पीडितांची भेट घेतली. उत्तर प्रदेश सरकारकडं पीडितांच्या कुटुंबीयांना लवकर मदत देण्याची मागणी केली. यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या निधीतून मदत करण्यात येणार असल्याचं आश्वासन पीडित कुटुंबाना दिलं, अशी माहिती पीडितांनी दिली.
हेही वाचा :
- हाथरस सत्संग चेंगराचेंगरी प्रकरण : राहुल गांधींनी घेतली हाथरस चेंगराचेंगरीतील पीडितांच्या नातेवाईकांची भेट - Hathras Stampede
- हाथरस सत्संग चेंगराचेंगरी; भोलेबाबा दुधानं करायचा अंघोळ, त्याच दुधाची खीर बनवून वाटला जायचा प्रसाद - Hathras Satsang Stampede
- हाथरस चेंगराचेंगरीनंतर 'भोलेबाबा' फरार : आत्तापर्यंत 116 भक्तांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - Hathras stampede