धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) Trekkers died in Kangra : हिमाचल प्रदेशात सध्या बर्फवृष्टी होत आहे. या ऋतूत थोडासा निष्काळजीपणा तुमचा जीव घेऊ शकतो. पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कांगडा जिल्ह्यातील बीर बिलिंगमध्ये मंगळवारी एका मुला आणि मुलीचं मृतदेह सापडलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघंही ट्रेकिंगसाठी गेले होते, मात्र परतत असताना घसरुन पडून त्यांचा मृत्यू झाला. 30 वर्षीय अभिनंदन गुप्ता आणि 26 वर्षीय प्रणिता बाळासाहेब अशी मृतांची नावं असून यातील 26 वर्षीय मुलगी ही महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर येतेय.
पाळीव कुत्र्यामुळं सापडले होते मृतदेह : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचेही मृतदेह त्यांच्यासोबत असलेल्या पाळीव कुत्र्यामुळं सापडले. तरुण आणि तरुणीच्या मित्रांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बचाव पथक रवाना करण्यात आलं होतं. कांगडा एएसपी बीर बहादूर यांनी सांगितलं की, कुत्र्याच्या सतत भुंकण्यामुळं बचाव पथक घटनास्थळी पोहोचू शकलं. तिथं मंगळवारी दोघांचे मृतदेह सापडले.
रविवारी निघाले होते ट्रेकिंगसाठी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबच्या पठाणकोटचा रहिवासी अभिनंदन गेल्या 4 वर्षांपासून स्थानिक गावात राहत होता. तो पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंग करत होता. तर प्रणिताही काही दिवसांपूर्वीच इथं आली होती. बर्फवृष्टी पाहता रविवारी दोन जोडपे ट्रेकिंगसाठी बाहेर पडले होते. सोमवारी एक जोडपं ट्रेकिंगवरून परतले, पण बराच वेळ होऊनही अभिनव आणि प्रणिता परत न आल्यानं त्यांच्या मित्रांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी रेस्क्यू टीम पाठवली.
"प्रथम दृष्टीक्षेपात असं दिसतं की दोघंही बर्फात घसरल्यानं जखमी झाले आणि नंतर प्रचंड थंडीमुळं दोघांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. दोन्ही मृतदेहांचं शवविच्छेदन करुन ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत." - बीर बहादूर, एएसपी, कांगडा
कुत्र्यानं रेस्क्यू टीमला केली मदत : अभिनव आणि प्रणिता यांच्यासोबत जर्मन शेफर्ड जातीचा पाळीव कुत्रा होता. जो जवळपास दोन दिवस त्यांच्यासोबत राहिला. या पाळीव कुत्र्याच्या भुंकण्यामुळंच बचाव पथकाला त्यांच्या ठिकाणाची माहिती मिळाली. पोलिसांनी स्थानिक लोक आणि माउंटन पारा नावाच्या गटाच्या मदतीनं बचावकार्य सुरु केलं. त्यांना अथक परिश्रमानंतर तरुण आणि तरुणीच्या मृतदेहापर्यंत पोहोचवण्यात यश आलं.
"त्यांच्या साथीदारांच्या माहितीच्या आधारे आम्ही बचावकार्यासाठी बाहेर पडलो. आम्हाला दोघांचेही मृतदेह सापडले. इथं खूप बर्फवृष्टी झालीय आणि तिथून घसरणीही झाली आहे. घटनास्थळ पाहता असं दिसते की, ते अनेकवेळा पडले आहेत, त्यामुळं त्यांना गंभीर दुखापतही झालीय. बर्फावर लांबवर त्यांच्या पायांचं ठसे आहेत" - पॅरा माउंटन रेस्क्यू टीम
प्रशासनाचं आवाहन : बर्फवृष्टीचा हंगाम लक्षात घेता, हवामान खराब असताना ट्रेकिंगसाठी बाहेर पडू नये, असं आवाहन पोलीस प्रशासनाने केलंय. आजकाल ट्रेकिंगचे मार्ग व्यापलेले आहेत. त्यामुळं हरवण्याची किंवा घसरण्याची भीती कायम आहे. अशा वेळी थोडासा निष्काळजीपणा जीवघेणा ठरु शकतो. अशा भागात मोबाईल सिग्नलही खूप कमी असतो आणि बर्फवृष्टीच्या काळात कनेक्टिव्हिटीची समस्या वाढते. वेळेत मदत न मिळाल्यास समस्या वाढू शकतात, त्यामुळं खराब हवामानात काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा :