गाझियाबाद/नवी दिल्ली Ghaziabad Fire News : गाझियाबादमध्ये एका दुमजली घराला भीषण आग लागली. या आगीत होरपळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (12 जून) रात्री गाझियाबादच्या लोनी बॉर्डर भागात घडली. या घटनेमुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, आग आटोक्यात आली असून आग लागण्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. यासंदर्भात सध्या तपास सुरू आहे.
मृतांमध्ये दोन बालकांचाही समावेश : या घटनेसंदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्त दिनेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन बालकांचाही समावेश होता. यापैकी एक मुलगा 7 महिन्यांचा तर दुसरा आठ वर्षांचा होता. तसंच मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त यांमध्ये एका 35 वर्षीय व्यक्तीचाही समावेश आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. रुग्णालयात एका महिलेला आणि बालकाला दाखल करण्यात आल्याचंही दिनेश कुमार यांनी सांगितलं.
घटनेची चौकशी करण्यात येणार : हे घर सारीक नावाच्या ठेकेदाराचं आहे. घराला आग लागल्यानंतर सारीक घराबाहेर होते. बुधवारी रात्री ते घरी परतले. तेव्हा घराला भीषण आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. काही मशिन घरात ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळं आगीनं भीषण रूप धारण केलं. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा -